

नाशिक : राजापूर-मनमाड मार्गावरील लालपरी चालक आणि वाहकाने माणुसकी आणि कर्तव्याचे दर्शन घडवित कार्यतत्परता दाखवून दिली. एसटीत महिलेला प्रसुतीच्या वेदना जाणवत असतांना प्रसंगावधान राखत चालक-वाहकांनी एसटी थेट मनमाड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडे वळवित महिलेला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच महिलेची एसटीतच प्रसुती झाली. मात्र बाळासह आईला रुग्णालयात सुखरुप पोहोचवल्या बद्दल चालक वाहकांचे विविध स्तरावर कौतुक होत आहे.
राजापूर बसस्थानकातून राजापूर-मनमाड मार्गावरील लालपरीमध्ये (क्र.एमएच 14 बीटी 4495) भालूर येथील रहिवाशी सुनीता किशोर ढगे (रा.भालूर ता. नांदगाव जि. नाशिक) या दवाखान्यात येण्यासाठी बसल्या असतांना अचानक सायंकाळी 6:45 वाजता मनमाड रेल्वे ब्रिज येथे एसटी आल्यानंतर सुनिता ढगे यांना प्रसूती वेदना जाणवू लागल्या.
ढगे यांच्यासोबत असलेल्या आजींनी चालक राहुल पवार व वाहक संजय पवार यांना बस थांबविण्याची विनंती करीत प्रसुती कुठल्याही क्षणी होऊ शकत असल्याने सुनेला रिक्षात बसवून दवाखान्यात न्यावे लागणार असल्याचे सांगितले. मात्र प्रसंगावधान ओळखत वेळेचा अपव्यय न करता एसटी चालक राहुल पवार यांनी एसटी थेट मनमाड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाकडे वळविली. बस उपजिल्हा रुग्णालय येथे पोचल्यानंतर आरोग्यसेविकेने तपासणी करीत सुनीता ढगे या बसमध्येच प्रसुत झाल्याचे सांगितले त्यानंतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून बाळाला व आईला सुखरूप बसमधून उतरवले.
चालक वाहकांनी रिक्षाची वाट बघितली असती किंवा किंवा बस उपजिल्हा रुग्णालयात नेली नसती तर, काहीही अनर्थ होऊ शकला असता असे आरोग्यसेविकेने सांगितले. प्रसंगावधान राखल्याने एसटीतील सर्व प्रवाशांनी चालक-वाहकांचे कौतुक केले. माणुसकीचे दर्शन घडवणार्या अशा कृतींमुळेच प्रवाशांचा लालपरीवरील विश्वास अढळ असल्याचे सांगत एसटीचालक राहुल पवार आणि वाहक संजय पवार यांनी प्रसंगावधान राखत मदत केल्याने आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी त्यांचा सत्कार केला.