

निफाड (नाशिक) : निफाड तालुक्यात पुन्हा एकदा थंडीचा कोप पाहायला मिळत आहे. शुक्रवारी निफाडचा पारा ५.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीमुळे निफाड शहर आणि ग्रामीण परिसर गारठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून तापमानात चढउतार होत असताना शुक्रवारी पहाटे बोचऱ्या वाऱ्यासह थंडीची लाट धडकली. थंडीचा जोर प्रचंड होता. सकाळी उशिरापर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला दिसत होता. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे आणि ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. या कडाक्याच्या थंडीचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे
तापमान ५ अंशांच्या आसपास आल्याने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती आहे. बागांच्या संरक्षणासाठी शेतकरी पहाटेपासूनच बागांत धूर शेतकोट्या करणे आणि पाणी देण्यासारखे उपाय करत आहेत. गहू आणि हरभरा पिकासाठी ही थंडी पोषक असली तरी द्राक्षासाठी मात्र चिंतेची बाब ठरत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.