नाशिक : तपोवनातील वृक्षतोडीविरोधात संभाजी ब्रिगेडने शनिवारी (दि. १३) प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन केले. यावेळी 'हा सातबारा कोणाचा... रामाचा... रामाचा, गिरीश महाजन गो बॅक... गो बॅक, तपोवन हेच आमचे धन' अशा घोषणा देत विरोध दर्शवला. तपोवनातील झाडांची कत्तल केल्यास, नाशिककरांचा आवाज बनून संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आखरे यांनी शनिवारी तपोवनाला भेट देत तेथील वृक्षांवर प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेले पोस्टर्स लावले. बहुजनांचा नायक असलेल्या प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन सत्ताधारी मतांचा जोगवा मागतात. मात्र, 'मुंह मे राम आणि बगल मे कुल्हाडी' अशी त्यांची भूमिका असल्याचे संबंध महाराष्ट्राला दिसून आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आखरे म्हणाले, तपोवन वृक्षतोडीप्रकरणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे.
संबंध महाराष्ट्रातून पत्राद्वारे तपोवन वाचवा अशी आग्रही मागणी केली जात असल्याने ही वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर सांगणार आहे. साधुंच्या नावाखाली काही खासगी संधीसाधू तपोवन भकास करू पाहत आहे. त्यांच्या निषेधार्थ नाशिककरांचे संघटन करत तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, संभाजी ब्रिगेडचे नेते नितीन रोठे, शेतकरी चळवळीतील कैलास खांडबहाले, जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ, महानगरप्रमुख विकी गायधनी, मंदार धिवरे, नीलेश गायकवाड, नितीन काळे, वैभव गायधनी, प्रेम भालेराव, सनी ठाकरे, प्रथमेश पाटील, गणेश पाटील, प्रथमेश मुळे उपस्थित होते.
सरकारला थेट इशारा
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन वृक्षप्रेमींच्या भावना लक्षात न घेता, हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहेत. त्यांनी अशाच पद्धतीने वृक्षांच्या कत्तली चालवल्या तर नाशिककरांचा आवज बनून तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आंदोलनात उतरणार आहे. या आंदोलनाची सुरुवात कुंभमेळा मंत्री महाजन यांच्यापासूनच केली जाणार आहे. त्याच्या परिणामांची चिंता राज्य सरकारने करावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला.