जिल्हा वाहतूक शाखा स्पीडगनद्वारे महामार्गावर तासनतास दंडात्मक मोहीम राबवते. मात्र, दहाव्या मैलावर दररोज होणार वाहतूक कोंडी फोडण्याकडे फिरकत नसलाचे चित्र आहे. वाहनांची गती मोजण्यात दाखवली जाणारी सतर्कता सुरळीत वाहतूक ठेक्यात का दाखविली जात नाही, असा सवाल वाहनधारक विचारत आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावरील महत्त्वाची समजली जाणारी चौफुली म्हणून येथील दहाव्या मैल चौफुलीची ओळख आहे. विमानतळाकडे याच चौफुलीवरून जावे लागते. या ठिकाणी वाहतुकीची कायमच ओरड असते, त्यातच सध्या द्राक्षाच्या हार्वेस्टिंगचा हंगाम असल्याने जानोरी, पालखेड या ठिकाणी असलेल्या कोल्ड स्टोअरेजकडे जाणारे कंटेनर याच चौफुलीवरून जा-ये करत असल्याने सध्या सायंकाळी या ठिकाणी वाहतुकीचे तीन-तेरा वाजलेले असतात.
महामार्ग म्हटला की वाहन आणि वेग यांची स्पर्धा पाहायला मिळते. त्यातून ओढवणारे अपघात रोखण्यासाठी विविध नियम असले तरी त्याकडे कानाडोळा होतो. नियमभंग करणाऱ्यांना महामार्गावर जनार्दनस्वामी आश्रमापासून पिंपळगावपर्यंत वाहतूक विभागाचे पथक दंडात्मक दणका देत असते. नाशिककडे येताना सहापदरी महामार्गावर अन् शहराच्या ठिकाणी बांधलेल्या उड्डाणपुलाच्या पायथ्याशी अनेक वेळा स्पीडगनद्वारे वसुलीची जोरदार बॅटिंग सुरू असते. उड्डाणपुलाचा चढ असल्याचे लक्षात आल्याबरोबर वाहनांचा वेग सरासरीपेक्षा अधिक होतो, तीच वेळ ऑनलाइन पावतीफाड मोहिमेसाठी साधली जाते, अशा तक्रारी आहेत.
टार्गेटमुळे ठाण मांडून
काही शासकीय विभागांनाही वार्षिक वसुलीचे टार्गेट असते. त्यात वाहतूक शाखेचाही अंतर्भाव आहे. निर्धारित उद्दिष्ट पार करण्यासाठी वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित होताना दिसते. उड्डाणपुलाच्या चढावर अथवा उतारावर सरासरीपेक्षा किमान दहा ते वीसचा स्पीड आपोआप जास्त होतो, हीच वसुलीची संधी साधण्यासाठी पथक ठाण मांडून बसते.
वेगमर्यादा फलक गोंधळात टाकणारे
मेडिकल कॉलेजपासून पुढे सुरू झालेल्या उड्डाणपुलावरून नाशिकला जाताना रासबिहारी स्कूलच्या चढावाजवळ तर ओझरकडे येताना लोकमान्य हॉस्पिटलसमोरच्या कट ठिकाणी चार-पाच पोलिस अन् एक स्पीडगन वाहन सातत्याने धडकी भरवणाऱ्या स्थितीत उभी असते. ते लहान वाहनधारकांच्या जीवावर बेतू शकते. अशातच ठरवलेली वेगमर्यादा वाढवल्यावरदेखील जुनाच सूचना फलक आहे. स्पीडव्हॅनजवळ वाहनधारक थांबलाच तर त्याला तोंडी नियम सांगितले जातात. यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी वेगमर्यादा फलक लावावेत, मग दंड आकारावेत, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांचा प्रवास सुलभ व इच्छितस्थळी लवकर पोहोचावे म्हणून सरकार राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करते. रस्ते चकाचक होतात. त्यावर भरमसाट टोल आकारले जातात. तर दुसऱ्या बाजूला याच महामार्गावर स्पीडगनचे वाहन उभे करून वाहनधारकांना मोठा दंड ठोठावला जातो, हे म्हणजे पायात बेड्या टाकून शर्यत जिंकण्याच्या स्पर्धेसारखेच आहे. – कुंदन साहेबराव कदम, ओझर.
पोलिसदादा इकडे पण वेळ द्या
सध्या नाशिक ते मालेगाव धावणाऱ्या गाड्या दहावा मैलवर होणाऱ्या मोठ्या वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. याठिकाणी कधी-कधी अर्धा तास वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागतात. परंतु, तेथे वाहतूक पोलिस नेमक्या त्याच वेळी बेपत्ता असतात. वाहतूक सुरळीत ठेवणे हे प्रथम कर्तव्य असताना तासनतास वाहनात बसून स्पीडगन हाताळून ड्यूटी करण्याचे धोरण चुकीचे असल्याचे मत त्रस्त नागरिक मांडत आहेत.