

नाशिक : शहर व जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट पसरली आहे. मागील काही दिवसापासून पाऱ्यात कमालीची घसरण झाल्याने नाशिककर हाडे गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. रविवारी (दि.१४) पाऱ्यात किंचित वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे. नाशिककरांना दिवसभर उबदार कपडे परिधान करत वावरावे लागत आहे.
शुक्रवारी (दि.१२) हंगामातील सर्वात निच्चांकी (७.८ अंश) नोंद झाल्यानंतर नाशिकचे तापमान आणखी किती घसरणार या विचाराने नाशिककरांना हुडहुडी भरली होती. मात्र, त्यानंतर शनिवार, रविवारी पाऱ्यात किंचित वाढ झाल्याने नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला. रविवारी (दि.१४) नाशिकचे किमान तापमान ९.९ अंश नोंदवले गेले. दुसरीकडे निफाडमध्ये गारठा कायम आहे. रविवारी निफाडचे किमान तापमान ७.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज असल्याने, नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.