

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उकाडा वाढल्याने, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, दररोजच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने तापमानात चढ-उतार होत असल्याने, याचा परिणाम रब्बी पिकांवर होण्याची शक्यता आहे.
याशिवाय सततच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या आर्द्रतेमुळे मध्यम ते उंच ढगांची निर्मिती होत आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात आहे.
त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने, किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ होत असल्याने, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसभर उकाडा जाणवत असल्याने, नाशिककरांना फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाचा सामना करावा लागत आहे.
सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे उकाडा अशा विचित्र वातावरणाचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या मते, पुढील काही दिवसात राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा या भागात उन्हाची लाट येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.