Nashik Weather | नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला! शहरात पारा 10 अंशांवर, निफाडमध्ये 8.2 अंशांची नोंद

Nashik Weather | जिल्ह्यात थंडीचा कडाका आता चांगलाच वाढू लागला आहे. शनिवारी (दि. २१) सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहराचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर निफाडमध्ये पारा 8.2 अंशांपर्यंत नोंदविण्यात आला.
cold weather
cold weatherPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात थंडीचा कडाका आता चांगलाच वाढू लागला आहे. शनिवारी (दि. २१) सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहराचे किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर निफाडमध्ये पारा ८.२ अंशांपर्यंत नोंदविण्यात आला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत किमान तापमानात झालेली घसरण आणि पहाटे वाढलेला गारठा यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. विशेष म्हणजे, नाशिकचे कमाल तापमानही ३१.६ अंशांवर राहिले आहे.

cold weather
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे थंडीची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातच पारा सरासरीपेक्षा सुमारे चार अंशांनी खाली आल्याने हिवाळ्याचा प्रभाव जाणवू लागला असून, पुढील आठवडाभर जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान निरीक्षण केंद्राच्या आकडेवारीनुसार, शनिवारी नाशिकचे कमाल तापमान ३१.६, तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शुक्रवारीही किमान तापमान १० अंशांवरच होते. त्यामुळे सलग दोन दिवसांपासून पारा याच स्तरावर स्थिर आहे. दुसरीकडे, निफाडच्या कृषी संशोधन केंद्रात कमाल तापमान २९.५, तर किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

शुक्रवारी निफाडचा पारा ६.५ अंशांपर्यंत घसरला होता. त्यात १.७ अंशांची वाढ झाली असली, तरी थंडीची तीव्रता कायम असल्याने द्राक्ष उत्पादक पट्टयात पहाटेच्या थंडीमुळे बागांच्या व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये जाणवणारी गुलाबी थंडी यंदा उशिराने दाखल झाली.

मात्र, नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून तापमानात बदल होण्यास सुरुवात झाली असून आता तिसऱ्या आठवड्यात किमान तापमानात झालेली घसरण लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील 'अक्चान' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीमार्गे ओडिशाच्या दिशेने सरकत असल्याच्या पार्श्वभूमीवर वातावरणात बदल झाले आहेत.

cold weather
Nida Khan Divorce Case | निदा खान घटस्फोट प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी; नाशिक कौटुंबिक न्यायालयात काय घडणार?

या बदलांमुळे महाराष्ट्रात थंडीला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे हवामान अभ्यासकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात थंडीची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असला, तरी नाशिक शहरासह जिल्ह्यात आकाश प्रामुख्याने निरभ्र आहे. पहाटेही धुक्याचे प्रमाण फारसे जाणवलेले नाही. मात्र, रविवारी (दि. २२) शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचे धुके दाटण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.