

नाशिक : महावितरण कंपनीकडून करण्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व दुरुस्ती कामांमुळे शनिवारी (दि.२) सिडको व नाशिक पूर्व भागातील काही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पाणीपुरवठा) विभागाने याबाबत नागरिकांना पूर्वसूचना दिली आहे. मनपाच्या मुकणे रों वॉटर पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या रेमंड सबस्टेशनमध्ये विविध तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत.
यामध्ये बस आयसोलेटर अलाइनमेंट, अतिरिक्त २५ एमव्हीए पीटीआर-२ चे जंपर कनेक्शन तसेच इतर अनुषंगिक दुरुस्ती कामांचा समावेश आहे. या कामांसाठी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे मुकणे पंपिंग स्टेशनमधून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.
परिणामी, नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक २२, २४, २५, २६ (भागशः) तसेच २७, २८, २९ व ३१ या संपूर्ण प्रभागांमध्ये दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, नाशिक पूर्व भागातील प्रभाग क्रमांक १४, १५, २३ व ३० (भागशः) येथेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मनपाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नागरिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.