Nashik Water Crises | जिल्ह्यातील निम्मी धरणे काेरडेठाक

Nashik Water Crises | जिल्ह्यातील निम्मी धरणे काेरडेठाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – १५ जून सरल्यानंतरही मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील जलस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील प्रमुख चोवीस धरणांपैकी निम्मी धरणे कोरडीठाक पडली आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे जलसंकट अधिक गडद बनले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूरमध्ये १८ टक्केच साठा शिल्लक आहे.

देशात यंदा वेळेआधी मान्सूनने वर्दी दिली. दरवर्षीपेक्षा राज्यातही दोन दिवस अगोदरच त्याने हजेरी लावली. तळकोकणसह मुंबई, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर तसेच मराठवाड्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली. त्यामुळे या भागातील नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. मात्र, एकीकडे आभाळमाया करणाऱ्या पावसाने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अद्यापही म्हणावी तशी वर्दी दिलेली नाही. नाशिकमध्ये आजपर्यंत सरासरी ८० मिमीच्या आसपास पर्जन्याची नाेंद झाली असली तरी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निवळण्यासाठी तो पुरेसा नाही. त्यातच पावसाअभावी धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे.

जिल्ह्यातील चोवीस प्रकल्पांत केवळ ५ हजार २८३ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचे प्रमाण ८ टक्के इतके आहे. त्या तुलनेत गेल्यावर्षी याच कालावधीत धरणांमध्ये तिप्पट म्हणजेच १५ हजार ७६९ दलघफू जलसाठा (२४ टक्के) शिल्लक होता. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १०४६ दलघफू जलसाठा बाकी आहे. धरण समूहातील चारही प्रकल्पांत केवळ १६८२ दलघफू (१६.५५ टक्के) पाणी उपलब्ध आहे. दारणा समूहात ८४१ दलघफू (४.४५ टक्के), पालखेड समूहात ३०१ दलघफू (३.६२ टक्के), तर ओझरखेड समूहातील तिन्ही प्रकल्प मिळून 0 टक्के जलसाठा आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर समूहात २४५९ दलघफू (१०.६६ टक्के) तर पुनद समूहात शून्य टक्के साठा नोंदविण्यात आला आहे. पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास येत्या काळात जिल्ह्यापुढील जलसंकट अधिक गडद बनणार आहे.

ही धरणे कोरडीठाक

वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, केळझर, नागासाक्या, पुनद व माणिकपुंज.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news