

मुंबई : दिवाळीमध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सजावटीसह कुटुंबकबिल्यासह कपडे खरेदीची मोठी उत्सुकता असते. यंदाच्या दिवाळी फॅशन ट्रेंडमध्ये इंडो-वेस्टर्नसह पारंपरिक पद्धतीचे कपडे खरेदी करण्याकडे मोठा कल दिसत आहे.
मुंबईत कधीही कपडे खरेदी करण्यासाठीचे युवा पिढीचे आवडते ठिकाण म्हणजे चर्चगेट स्टेशनजवळील फॅशन स्ट्रीट. दिवाळी निमित्ताने शॉपिंगसाठी सध्या येथे गर्दी वाढली आहे. फॅशन स्ट्रीटसह दक्षिण मुंबईतील काळबादेवी (मरिन लाईन्स) येथील भुलेश्वर मार्केट, लोहार चाळ तसेच मध्यवर्ती ठिकाण असलेले दादर हे प्रमुख मार्केट आहे.
पश्चिम उपनगरांमध्ये हिल रोड (वांद्रे), सांताक्रुझ, अंधेरी तसेच मालाड आणि बोरीवली त्याच सोबत पूर्व उपनगरांमध्ये कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आणि ठाणे येथील बाजारपेठांमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे कपडे सुलभ दरांमध्ये उपलब्ध आहेत.
या दिवाळीत फॅशन ट्रेंडमध्ये इंडो-वेस्टर्न आणि पारंपरिक शैलींचे मिश्रण दिसून येत आहे. भरतकाम केलेले जंपसूट, प्री-स्टिच्ड साडी गाऊन आणि अनारकली. पारंपरिक फॅशनमध्ये बनारसी, सिल्क किंवा जॉर्जेट साड्या आणि चमकदार रंगांचा वापर लोकप्रिय आहे. आरामदायी आणि आकर्षक जंपसूट, जे ड्रेप केलेले किंवा बेल्टसह येतात. हे सूट पार्टीसाठी एक उत्तम पर्याय आहे.
साडी नेसण्याच्या पारंपरिक कटकटीशिवाय साडीचा लूक देणारा साडीचा गाऊन हा तरुणींमध्ये खूपच लोकप्रिय असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. भुलेश्वर मार्केटमध्ये सर्वच्या सर्व 12 महिने महिलांची शॉपिंगसाठी गर्दी होती. वांद्रे येथील शॉपिंग स्ट्रीट, हिल रोड या उत्तम शॉपिंग डेस्टिनेशनवरही एकापेक्षा एक डिझाइन आणि ट्रेंडमध्ये असलेले फॅशनेबल कपडे अगदी वाजवी दरात घेण्यासाठी गर्दी आहे. विलेपार्ले पश्चिम येथील वैविध्यपूर्ण इर्ला मार्केटमध्येही मोठी गर्दी होती.
पारंपारिक पोशाख खरेदी दादरमधील हिंदमाता मार्केट
तुमच्या पसंतीचे आणि अनेक व्हरायटीचे पारंपारिक पोशाख खरेदी करण्याचे एक हमखास ठिकाण असलेल्या दादरमधील हिंदमाता मार्केटमध्येही सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. घाऊक कापड बाजारपेठ असलेल्या येथील दुकानांमध्ये विविध प्रकारचे कपडे आणि रेडीमेड डिझाइन तसेच विविध कच्च्या मालाचे पर्याय उपलब्ध आहेत. साड्या, पंजाबी ड्रेस, शरारा सूट, लेहेंगा, शेरवानी, गाऊन आणि सूट हे सर्व एकाच ठिकणी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे येथील किमती बाजारभावापेक्षा खूप कमी आहे.