

वणी (नाशिक): वणी शहराचा विकास दीर्घकालीन दृष्टीकोनातून व्हायला हवा असताना, काही ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विकासाच्या नावाखाली उघडपणे गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. छत्रपती शाहू महाराज नगरातील भुयारी गटारीच्या कामामुळे ही परिस्थिती स्पष्टपणे समोर आली आहे.
या कामासाठी केवळ १० इंची पाईपांचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले असून, अशा पाईपांचा भविष्यात कोणताही उपयोग होणार नाही, असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यांनी वारंवार ठेकेदाराचे लक्ष वेधले तरीही काम पूर्ववत सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. यावेळी एका रहिवाशाने सांगितले, “आम्ही विकासकामांना विरोध करत नाही, पण ती कामे टिकाऊ आणि दर्जेदार असावीत ही अपेक्षा आहे. फक्त १० इंची पाईप वापरल्यामुळे पावसाळ्यात गटारी ओव्हरफ्लो होणार हे नक्कीच.” कामादरम्यान अनेक घरांच्या पाण्याच्या पाइपलाईन्स तुटल्या, काहींच्या घरासमोरील पायऱ्या तोडल्या गेल्या, तरीही ठेकेदाराने कोणतीही दखल घेतली नाही.
ही कामे विकासाची की लुटीची?
त्यातच ग्रामविकास अधिकारी आणि शाखा अभियंत्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवण्यात आल्याने नागरिकांचा रोष अधिक वाढला आहे. ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांनी सांगितले, “ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर मी स्वतः ठेकेदाराला काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाहणी करूनच पुढील काम सुरू होईल. जर आदेश न पाळले, तर ठेकेदारावर कठोर कारवाई होईल.” तर पंचायत समिती दिंडोरीच्या सा.बा. विभागाचे शाखा अभियंता रविंद्र बाविस्कर यांनी म्हटले, “भुयारी गटारीसाठी किमान दीड फूट व्यासाचे पाईप आवश्यक असतात. येथे फक्त १० इंची पाईप वापरल्याचे लक्षात आले आहे. आम्ही या कामाची चौकशी सुरू केली असून ठेकेदाराला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आदेश न मानल्यास कायदेशीर कारवाई होईल.” नागरिक आता थेट विचारत आहेत की, “ही कामे विकासाची की लुटीची?” या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीतील गोंधळ आणि ठेकेदारांचे वर्चस्व उघड झाले आहे.