

वणी (नाशिक): वणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामस्थांच्या उदासीनतेमुळे हातघाईने रद्द करावी लागल्याने ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच नामुष्की झाली आहे. अनिवार्य असलेली ग्रामसभा तब्बल महिनाभर उशिराने आयोजित करण्यात आल्याने ग्रामस्थांनीच सभेकडे पाठ फिरवल्याने सभेला अत्यंत अल्प उपस्थिती होती.
ग्रामसभेची माहिती दोन दिवस आधी रिक्षावरील ध्वनीप्रसारकाद्वारे देण्यात आली होती. त्यानुसार रविवार (दि.2) दुपारी १ वाजता सभा होणार होती, परंतु फक्त 15 ते 20 ग्रामस्थच आणि काही मोजके सदस्यच उपस्थित असल्याचे चित्र होते. सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, सदस्य राकेश थोरात, किरण गांगुर्डे, जगन वाघ, नामदेव गवळी आणि राहुल गांगुर्डे हे सभेला उपस्थित होते. मात्र उर्वरित सदस्य अनुपस्थित राहिले, विशेष म्हणजे, नऊ महिला सदस्यांपैकी एकही महिला सभेला उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
दुर्देवाने गेल्या काही वर्षांपासून वणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांचे हेच चित्र दिसून येत आहे. नियोजित ग्रामसभा वेळेवर न घेणे, विषयांवर गंभीर चर्चा न होणे आणि ठराव फक्त कागदावरच राहणे ही नियमित बाब झाली आहे. अनेक ठराव अमलात आणले जात नाहीत, तर काही ठराव गोंधळात पास करून घेतले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.
ग्रामस्थांमध्ये सभेमधील उपस्थित संख्येच्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया हे वाक्य आता फक्त भाषणापुरते उरले आहे, अशी टीका ग्रामस्थांनी केली. शहराचा विकास, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, आपत्ती व्यवस्थापन यांसारखे महत्त्वाचे विषय वारंवार पुढे ढकलले जात आहेत.
स्थानिकांच्या मते, ग्रामसभा वेळेवर घेणे आणि त्यात लोकांच्या समस्या ऐकणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. परंतु आज ती केवळ औपचारिकता बनली आहे. या निष्क्रियतेकडे सतत दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर आता ग्रामस्थांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या या प्रशासनाची जबाबदारी शेवटी कोण घेणार? असा सवाल सभेप्रसंगी उपस्थित करण्यात आला.