

इंदिरानगर ( नाशिक ) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वालदेवी नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून, शुक्रवारी (दि. 22) दुपारी दाढेगाव येथील वालदेवी नदी पुलाजवळ वाहून जात असलेल्या दोन जणांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास संसरी येथील संजय बारकू गोडसे (13), सार्थक शर्मा (22) हे दोघे पाथर्डी गावाकडून दाढेगावकडे दुचाकीवरून जात असताना दाढेगावाजवळ वालदेवी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पुलावरून जात असताना या दोघांची दुचाकी घसरून पाण्यात पडली.
त्यामुळे दुचाकीवरील दोघेही वाहून जात होते. ही बाब नदीकिनारी असलेल्या काही ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ आरडाओरड करत ग्रामस्थांना जमा केले. यावेळी बापू जाधव आणि राजाराम पवार या ग्रामस्थांनी जिवाची पर्वा न करता पाण्यात उड्या घेत वाहून जात असलेल्या गोडसे याला बाहेर काढले, तर दुसर्याला ग्रामस्थांनी दोरी टाकून पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. या घटनेत जखमी झालेल्या दोघांना तातडीने नाशिकरोड परिसरातील जयरामभाई बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.