

देवळाली कॅम्प ( नाशिक ) : मागील दोन दिवसांपासून दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि. 20) रात्री दारणा नदीवर घोटी - सिन्नर मार्गावरील शेणीत पूल पाण्याखाली असताना कारचालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या मध्यभागी अडकलेल्या कारमधील पती - पत्नीला स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला, तर कॅन्टोन्मेंट बोर्ड व भगूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने अडकलेली कार बाहेर काढली.
गेल्या दोन दिवसांपासून दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. घोटी - सिन्नर या महामार्गावर शेणीत पुलाची उंची कमी असल्यामुळे बुधवारी सायंकाळी पूल पाण्याखाली बुडाल्याची माहिती पोलिसपाटील यांनी शासकीय यंत्रणेला कळवली होती. परंतु पोलिसांकडून पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड करण्याकडे दुर्लक्ष केले. रात्री 10 च्या सुमारास मुंबई येथील रहिवासी अनस अब्दुल कुरेशी हे आपल्या पत्नीसह कारने भगूरकडून घोटीकडे जात असताना, त्यांना पुलावर असलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांनी कार तशीच पुढे नेली.
मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहाने कार बंद पडली. त्याच वेळेस पुलाच्या समोरच्या बाजूस उपस्थित असलेले पोपटराव फोकणे, विनोद जारस, रोहित पाळदे, गौरव अमेसर यांच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लहवित, भगूर गावातील नागरिकांना फोन करून बोलावून घेतले. वाडिवऱ्हे पोलिस ठाणे, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड, भगूर नगर परिषद अग्निशमन दलाला सतर्क केले. राहुल ससाणे, सागर घोरपडे व स्थानिक नागरिकांनी कारपर्यंत जाऊन अनस अब्दुल कुरेशी व त्यांच्या पत्नीला सुखरूप बाहेर काढले, तर देवळाली कॅन्टोन्मेंट व भगूर नगरपालिका यांचे अग्निशमन विभागाचे फायरमन आदित्य निसाळ, निखिल भिसे, मंगेश गोडसे, परशुराम कुटे, लहवित पोलिसपाटील संजय गायकवाड आदींनी दोरखंडाच्या साहाय्याने कार खेचून पुरातून बाहेर काढली.
कुरेशी यांनी आपली कार पुलावर पुढे नेल्यानंतर पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कार बंद केली. पाण्याच्या प्रवाहाने कार पुलाच्या कठड्याकडे ढकलली जाऊन कठड्याच्या खांबाला अडकल्याने अनर्थ टळला, खांबामुळेच नागरिकांना जोडप्याची सुटका करता आली.
दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबरोबरच नाणेगाव, राहुरी, शेणीत येथे पुलावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
श्रीनिवास देशमुख व. पोलिस निरीक्षक देवळाली कॅम्प.
सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फोकणे यांनी नाशिक मनपा अग्निशमन दलाला कळवली असता त्यांनी तातडीने येण्याची तयारी दर्शवली. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्ड व भगूर नगरपालिका अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्याने मनपा अग्निशमन दलाला तूर्त थांबण्यास सांगण्यात आले.