

कळवण (नाशिक) : कळवण तालुक्यात वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ९२ गावांतील ९४६ शेतकऱ्यांच्या एकूण ३७८.२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या पंचनामे पूर्ण केले असून, १ कोटी २ लाख ११ हजार ४१० रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
एप्रिलनंतर मे महिन्यातही अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. ६ ते १४ मेदरम्यान ग्रामीण व आदिवासी भागात पावसाने थैमान घातले. काठरे दिगर, सुपले दिगर, खर्डे दिगर, पुनंदनगर, शिरसमणी, एकलहरे, नाकोडे, बेज, कोसवण, खिराड, मोहपाडा, तिन्हळ खुर्द, सरले दिगर, मळगाव खुर्द, पिंपळे बु., दरेभणगी, भैताणे दिगर, कोसुर्डे, जामले हतगड, चाफापाडा आदी गावांमध्ये घरांचे पत्रे उडाले, भिंती पडल्या, बैल गोठे, कांद्याच्या चाळी, हॉटेल व घरांचे एकूण ९८ ठिकाणी नुकसान झाले.
महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त अहवालानुसार, फळपिके वगळून कोरडवाहू जिराईत पिकाखालील क्षेत्रात ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचे आढळले. एका शेतकऱ्याचे ०.१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यास १३६० रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित आहे.
बागायत क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, ९१ गावांतील ९४५ शेतकऱ्यांचे ३७८.१५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये कांद्याचे ३२६.५० हेक्टर, बाजरीचे २३.४५ हेक्टर, मिरची ४.८० हेक्टर, टोमॅटो ९.१० हेक्टर, गहू ०.५० हेक्टर, मका ०.२० हेक्टर आणि अन्य भाजीपाला १३.६० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे सुमारे ३७८ हेक्टरवरील उभे पीक, भाजीपाला, आंबा, फळबागा आणि काढणी करून ठेवलेला कांदा, मका यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यात उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र २८ हजार ७१६ हेक्टर कांद्याचे क्षेत्र असून, त्यात ३२६.५० हेक्टर क्षेत्रावरील शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवण दौऱ्यात नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठविण्याच्या सूचना केल्याने अहवाल सादर झाला आहे.
नितीन पवार, आमदार, कळवण.
मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ९२ गावांतील ३७८.२५ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ९४६ शेतकऱ्याच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. ९८ ठिकाणी घर व कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. मदतीसाठी नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.
रोहिदास वारुळे, तहसीलदार, कळवण