

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विकासकामांना पुन्हा एकदा गती मिळाली आहे. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीमुळे विकासकामांचा वेग काहीसा मंदावला होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या पूर्वार्धात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विविध प्रकल्पांवरील कामगार, कंत्राटदार आणि यंत्रणा सुट्टीवर गेल्याने अनेक ठिकाणचे कामकाज ठप्प झाले होते.
मात्र, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात कामगार पुन्हा कामावर परतल्याने सिंहस्थ विकासकामांनी वेग पकडला आहे. असे असले तरी मार्च २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांसमोर उभे आहे.
शहरातील सर्वाधिक लक्षवेधी प्रकल्पांपैकी एक असलेल्या द्वारका चौकातील अंडरपासचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. २१३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरअखेरपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. अंडरपास सुरू झाल्यास द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सिंहस्थ काळात शहरात दाखल होणाऱ्या वाहनांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे वाहतूक, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, नदी प्रदूषण नियंत्रण आणि भाविकांसाठीच्या मूलभूत सुविधांची उभारणी वेळेत होणे अत्यावश्यक आहे.
सिंहस्थ सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याबरोबरच भाविकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजित मार्च २०२७ च्या मुदतीची वाट न पाहता काही महत्त्वाचे प्रकल्प त्यापूर्वीच पूर्ण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे सांडपाणी नदीत जाण्यापूर्वीच स्वतंत्रपणे वळवण्याच्या प्रणालीचे काम वेगाने सुरू आहे. गोदावरी नदीकाठवरील घाटांचे सुशोभीकरण आणि पुनर्विकासाची कामेही प्रगतिपथावर आहेत.
सिंहस्थ काळात रामकुंड आणि गोदावरी घाटांवर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने या कामांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. घाटांची सुरक्षितता, स्वच्छता आणि भाविकांच्या हालचालींसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांकडून कामे मार्गी लावली जात आहेत.
वेळेचे नियोजन महत्त्वाचे
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांचा वेग पुन्हा वाढणे ही दिलासादायक बाब आहे. मात्र, केवळ कामांना गती देऊन चालणार नाही, तर प्रत्येक प्रकल्पाची टप्पानिहाय प्रगती, भूसंपादनातील अडथळे, निधीची उपलब्धता आणि यंत्रणांमधील समन्वय यावरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
मार्च २०२७ पर्यंतची मुदत लक्षात घेता आगामी तीन ते चार महिने निर्णायक ठरणार आहेत. विशेषतः साधुग्राम आणि रिंगरोडसारख्या मोठ्या प्रकल्पांतील अडथळे तातडीने दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा कोट्यवधी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी केलेले नियोजन प्रत्यक्ष सिंहस्थ काळात अपुरे पडण्याची शक्यता आहे.
साधुग्राम आणि रिंगरोडचे आव्हान कायम
शहरातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांनी वेग घेतला असला, तरी सिंहस्थाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा साधुग्रामचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. साधू-महंत, आखाडे आणि विविध धार्मिक संस्थांच्या निवासासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे भूसंपादन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे साधुग्राम उभारण्याच्या कामाला अपेक्षित गती मिळण्यात अडथळे येत आहेत.
सिंहस्थासाठी साधू-महंतांच्या निवासाची व्यवस्था वेळेत उभी करणे आवश्यक असताना भूसंपादनाचा तिढा कायम राहणे प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणाऱ्या रिंगरोड प्रकल्पासमोरही अनेक अडचणी आहेत.
रिंगरोडचे अलाइनमेंट, जमिनीचे भूसंपादन आणि शेतकऱ्यांचा विरोध या मुद्द्यांवर अद्याप एकमत झालेले नाही. भूसंपादनाच्या प्रक्रियेवरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. रिंगरोडचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास सिंहस्थ काळातील वाहनांची गर्दी शहरांतर्गत रस्त्यांवर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.