

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी भाविक येणार असून, त्यानुसार कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने खत प्रकल्प विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या क्षेत्रातील कचरा नाशिकच्या खत प्रकल्पात आणण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे. तसेच, तेथून कचऱ्याची वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्यामुळे सिंहस्थ निधीतून त्र्यंबकेश्वर येथे स्वतंत्र खत प्रकल्प उभारण्यात जाणार आहे.
शहर वेगाने विस्तारत आहे. शहरात सद्यस्थितीत पावणेसहा लाख मिळकती आहेत. शहरातून दररोज सुमारे ७५० टन कचरा ४३१ घंटागाड्यांद्वारे खत प्रकल्पात विल्हेवाटीसाठी वाहून नेला जात आहे. आगामी सिंहस्थात देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येतील. पर्यायाने कचऱ्याचे प्रमाणही वाढणार आहे.
सिंहस्थ काळात दररोज सुमारे एक हजार टन कचरा खत प्रकल्पात विल्हेवाटीसाठी वाहून नेला जाईल. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पुरेशा सुविधांच्या निर्मितीकरिता खत प्रकल्प विस्तारीकरणाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या क्षेत्रातील कचरा नाशिकच्या खत प्रकल्पात विल्हेवाटीसाठी नेण्याचा प्रस्ताव होता. मात्र नाशिक ते त्र्यंबकेश्वर अंतर लक्षात घेता, कचऱ्याची वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्यामुळे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी स्वतंत्र कचरा डेपो प्रस्तावित आहे.
त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र कचरा डेपो उभारण्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पही उभारला जाणार आहे. यासाठी मोठा खर्च करावा लागेल. तो सिंहस्थ निधीतून भागविला जाणार आहे.