

त्र्यंबकेश्वर (नाशिक ): राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी (दि. 30) नाशिक–त्र्यंबकेश्वर आणि घोटी–त्र्यंबकेश्वर या रस्त्यांची पाहणी केली. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पेगलवाडी फाटा येथे प्रयाग तीर्थ परिसरात भेट दिली. त्यावेळी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्यांच्याशी संवाद साधत रस्ते विस्तारामुळे जमीन गमावण्याच्या समस्या मांडल्या. मंत्री भोसले यांच्यासमवेत आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. बांधकाम मंत्र्यांचा दौरा असल्यानेच या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचेही दिसून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, हा रस्ता पालखी मार्गाचा भाग असून आठपदरी करण्याचा प्रस्ताव आहे. यावर आमदार खोसकर यांनी अपवादात्मक परिस्थितीतच पालखी या मार्गाने जाते आणि प्रारंभी वारकरी संख्या कमी असते, असे सांगून सुरुवातीच्या 20 किलोमिटर भागातच रुंदीकरण करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका मांडली. पालखी मार्ग करायचा असेल, तर तो अखंड पंढरपूरपर्यंत असावा, असेही त्यांनी नमूद केले. मार्गाचे अनावश्यक रुंदीकरण केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने हा प्रस्ताव पुन्हा विचारात घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शासनाचा सहापदरी रस्त्याचा पर्याय विचाराधीन असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर–घोटी रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असून सध्या चारपदरीकरणाचे काम सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून चिंता व्यक्त केली. विविध प्रकल्पांमुळे तालुक्यातील 76 टक्के जमीन आधीच संपादित झाली असून, आता आणखी रुंदीकरण केल्यास केवळ 24 टक्के जमीन उरेल, असे त्यांनी सांगितले. घोटी–त्र्यंबकेश्वर रस्ता रोजगार हमी योजनेतून तयार झाला असल्याने त्या वेळी जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सध्याचा 24 मीटर रस्ता दोन्ही बाजूंना 10 मीटरने वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने या निर्णयाला तीव्र विरोध आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी संपूर्ण माहिती ऐकून घेतली आणि हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्या सोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. नागपूर येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ता दुरुस्ती पाहून नागरिक अचंबित
नाशिक - त्र्यंबक रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला आहे. विशेषतः पेगलवाडी फाटा ते तळवाडे फाटा दरम्यान झालेले खड्डे दोन वर्षांपासून कायम आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपे आणि गवताने साइडपट्टी दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवणे अशक्य होत आहे. गुरुवारी बांधकाम विभागाचे मंत्री येणार असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या साइड पट्टी जेसीबीने दुरुस्त करत माती टाकण्यात येत होती. अचानक सुरू झालेला हा प्रकार पाहून नियमित प्रवास करणारे वाहनचालक अचंबित झाले होते.