

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा भाग म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे (एनटीकेएमए) टेंट सिटी सुविधा उभारणी आणि संचालनाबाबत भागधारकांसमवेत चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह होते. या बैठकीत ‘टेंट सिटी’ विकासासाठी एकसंध अन् शिस्तबद्ध कार्यपद्धतीची गरज असल्याचा सूर चर्चेतून निघाला.
बैठकीला नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, एनटीकेएमए सहायक आयुक्त सौरीश सहाय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, एनटीकेएमए तहसीलदार योगेश चंद्रे, मकरंद दिवाकर आदी उपस्थित होते. नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात हे चर्चासत्र पार पडले.
या दरम्यान, कुंभमेळ्याच्या कालावधीत उभारल्या जाणाऱ्या टेंट सिटीचे नियोजन, नियमन व संचालन याबाबत चर्चा करण्यात आली. टेंट सिटी विकासासाठी प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली एकसंध आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेसह दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक नागरी सुविधा, स्वच्छता, वाजवी दर, सुरक्षितता तसेच कुंभमेळ्याच्या वाहतूक व गर्दी व्यवस्थापन आराखड्याशी टेंट सिटींचे समन्वयित नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
या मुद्द्यांवर मंथन
सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टेंट सिटी सुविधांत एकसमानता राखणे, भागधारकांची निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविणे आणि अधिकृत टेंट सिटीबाबतची खात्रीशीर माहिती भाविकांपर्यंत अधिकृत माध्यमातून पोहोचविण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पार्किंग, अंतर्गत वाहतूक व्यवस्था आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाबाबत संकल्पनात्मक स्तरावर विचारमंथन करण्यात आले.
नियंत्रित व अधिकृत टेंट सिटी सेवांच्या माध्यमातून भाविकांचा अनुभव अधिक सुलभ व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही चर्चा उपयुक्त ठरेल, असे एनटीकेएमएच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. शिवाय, भागधारकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून टेंट सिटीसंदर्भातील धोरणे व कार्यपद्धती निश्चित करण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.