

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील हंडोगे दांपत्याने आपली तीन मुले दत्तक दिली किंवा त्यांची विक्री केली का? या प्रकरणी चौकशी समितीने अहवाल विभागीय महिला व बालकल्याण विभागाला सादर केला आहे. त्यानंतर या प्रकरणी आता जि. प. च्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना चौकशी करण्याचे आदेश देत, अहवाल मागविला आहे.
टाके देवगाव व वावी हर्ष या दोन्ही गावांमध्ये बरड्याची वाडी असा परिसर आहे. या ठिकाणी बच्चूबाई व विष्णू हंडोगे हे दाम्पत्य कच्च्या घरात राहते. त्यांनी आजवर १२ आपत्यांना जन्म दिला. यात विशेष म्हणजे २२ मार्च २००६ रोजी त्यांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण त्यानंतरही त्यांना अपत्य कसे झाले, याविषयी आरोग्य विभाग स्वतंत्ररित्या चौकशी करत आहे.
तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या त्र्यंबकेश्वर 'बालप्रकल्प अधिकारी' मंगला भोये यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. त्यांनी आपला अहवाल महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला आहे. त्यावर आता कायदेशीर सल्ला घेतला जात असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांकडून स्वतंत्र अहवाल मागविला आहे. त्याबाबत पत्र देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन हा अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिल्या आहेत.