

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील महिलेने बाळांची विक्री केल्याप्रकरणी नियुक्त चौकशी समितीचा अहवाल शुक्रवारी (दि.१२) देखील सादर झालेला नाही. समितीकडून शुक्रवारी सायंकाळपर्यंत या संदर्भातील कार्यवाही सुरू होती. त्यामुळे शनिवारी (दि.13) हा अहवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर होण्याची शक्यता आहे.
त्र्यंबकेश्वर येथील टाके देवगाव ग्रामपंचायत हद्दीतील बरड्याची वाडीतील बच्चुबाई हंडोगे या ४५ वर्षीय महिलेला तब्बल १४ मुले झाली. यापैकी सहाहून जास्त मुलामुलींची पैशासाठी विक्री झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. बाळविक्रीच्या संशयानंतर आशा कर्मचारी महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित केल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती मागवली. बाळविक्री प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली.
या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला बालकल्याण आणि पोलिसांना चौकशीचे निर्देश देत अहवाल मागवला. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी सहा अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. समितीकडून गेल्या तीन दिवसापासून अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी त्याला अंतिम स्वरुप येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सायंकाळपर्यंत हा अहवाल अंतिम होऊ शकलेला नाही. त्यांच्या अहवालातून गंभीर बाबी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चौकशी समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येईल.
सुनील दुसाणे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी