Nashik Tribal Commissionerate : आर्थिक विवंचनेमुळे रोजंदारी कर्मचार्यांना उपवास
नाशिक : बाह्यस्त्रोतांव्दारे भरती प्रक्रिया रद्द करा, या मागणीसाठी भर पावसात रोजंदारी कर्मचारी आदिवासी आयुक्तालयासमोर ठाण मांडून बसले आहेत.
लेखी स्वरुपातील नियुक्ती पत्र देईपर्यंत आयुक्तालया समोरुन हटणार नाही, असा निर्धार या रोजंदारी कर्मचार्यांनी केला आहे. सोमवारी (दि.14) रोजी आर्थिक विवंचनेमुळे सुमारे 600 आंदोलनकर्त्यांना उपवास घडला.
आदिवासी आयुक्तालयासमोर सुरु असलेल्या रोजंदारी कर्मचार्यांच्या आंदोलनाचा सोमवारी (दि.14) सहावा दिवस होता. आंदोलनात सहाशे आंदोलकांनी भाग घेतला आहे. कंत्राटी शिक्षक कर्मचार्यांना मागील महिन्यात 16 जूनपासून कमी करण्यात आले आहे. याविरोधात या कर्मचार्यांनी वज्रमुठ केली असून पदावर पुन्हा रुजू करुन घ्यावेत, यासाठी आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन करीत आहे. शुक्रवारी (दि.11) आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेत बॅरिकेडस तोडत आयुक्तालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. शनिवारी (दि.12) मंत्री नरहरी झिरवाळ, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार यांनी प्रशासनासोबत साडेतीन तास चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी लेखी द्या अशी ठाम भुमिका घेतल्याने आंदोलनाचा तिढा सुटला नाही. रविवारी साप्ताहिक सुटी असूनही आंदोलक आदिवासी आयुक्तालयासमोर ठाण मांडून बसले आहेत. पावसाच्या सरी कोसळत असतांना प्लॅस्टिकचे छत तयार करुन आंदोलन सुरु ठेवण्यात आले आहे.
10 वर्षे पूर्ण झालेल्या 430 आंदोलकांना नियुक्ती पत्रे
ज्या रोजंदारी शिक्षक कर्मचार्यांनी 10 वर्षे पूर्ण केले आहेत, त्यांना प्रशासनाच्यावतीने रविवारी (दि.13) नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे. यापुर्वी आंदोलन न्यायालयात गेले असता न्यायालयात सादर केलेल्या यादीप्रमाणे ही नियुक्तीपत्रे देण्यात आली असून या रोजंदारी शिक्षकांना त्वरीत शाळेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या 430 शिक्षक़ कर्मचार्यांप्रमाणेच जोपर्यंत आम्हाला नियुक्तीपत्रे मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आंदोलनावर ठाम आहोत, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे.
महिला कर्मचारी चक्कर येऊन कोसळली
आंदोलनादरम्यान राजूर प्रकल्पातील रोजंदारी कर्मचारी सुलोचना माळी ही महिला सायंकाळी 5 वाजता चक्कर येऊन कोसळली. महापालिका आरोग्य पथकाने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळीच उपचार करण्यास सांगितले. परंतु पोलीसांनी तत्काळ हस्तक्षेप करत तिला जिल्हा रुग्णालयात नेले.
भेळभत्त्यावर गुजराण
आंदोलनकर्ते सध्या केवळ मसालेभात खाऊन गुजराण करत आहेत. सोमवारी दुपारी 4 पर्यंत आंदोलनकर्त्यांना उपवास घडला. सायंकाळी 5 वाजता सर्वांनी वर्गणी काढून भेळभत्ता आणला.
विद्यार्थी घडविणे आमचा धर्म
आदिवासी पाड्यांवरील आश्रमशाळांमध्ये रोजंदारी शिक्षक कर्मचारी एकावेळेस 3 ते 4 वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवितात. आम्हाला केवळ 15 ते 18 हजार रुपये पगार मिळतो. एवढ्या पगारात घर चालविणेही मुश्किल असताना आम्ही विद्यार्थी घडवित आहोत. अशा परिस्थितीत प्रशासनाने आमच्या नोकरीवर गदा आणली आहे. आम्ही स्थानिक असल्याने विद्यार्थ्यांशी आमची नाळ जुळलेली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्हाला माहीत आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
ठेकेदारी पध्दतीने आलेले शिक्षक केवळ हजेरी लावतील यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. प्रशासनाने दोन ओळीचे पत्र देऊन आंदोलनकर्त्यांची मागणी पूर्ण करावी.
रमेश अहिरे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3, वर्ग 4 संघटना, शासकीय आश्रमशाळा.

