

नाशिक : तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला सामोरे जावे लागलेल्या नाशिक महापालिकेने पर्यायी वृक्षलागवडीसाठी हरित अभियान हाती घेतले आहे. या वृक्षलागवडीसाठी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथून १५ फूट उंचीच्या रोपांची पहिली खेप नाशकात दाखल झाली आहे. सोमवार (दि. 15) पासून कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मखमलाबाद रोडवरील भोईर मळ्यातील अडीच एकर भूखंडावर वृक्षलागवडीस सुरुवात होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामसाठी अडथळा ठरणारी १,८२५ झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून विविध ठिकाणांहून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील वृक्षप्रेमींबरोबर बैठक घेत साधुग्राम, वृक्षतोड आणि माईस हब याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
त्याचबरोबर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनीदेखील तपोवनातील जुनी व मोठी वृक्षांव्यतिरिक्त इतर लहान झाडे तसेच झाडेझुडपे तोडावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्या बदल्यात शहरात विविध ठिकाणी १५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील १५ फूट उंचीच्या वृक्षांची लागवड करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. महाजन यांनी राजमुंद्री येथे स्वत: भेट देत लागवडीच्या रोपांची पाहणी केली होती. त्यानुसार शहरात वृक्षांची पहिली खेप शुक्रवारी (दि. १२) नाशिकमध्ये दाखल झाली. येत्या दोन दिवसांत वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
वृक्षलागवडीसाठी या प्रजातीची रोपे लावणार
वृक्षलागवडीसाठी वड, पिंपळ, नीम, चिंच, कवठ, भेंडी, आंबा, कदंब, जांभूळ यांसारख्या देशी प्रजातीच्या रोपांचा समावेश आहे. वृक्षारोपणाचा प्रारंभ मखमलाबाद रोडवरील भोईर मळ्यातील महापालिकेच्या उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेवर करण्यात येणार आहे. या ठिकाणी मनपातर्फे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
वृक्षलागवडीत लोकांचा सहभाग
वृक्षारोपण मोहिमेत शहरातील विविध सामाजिक, सेवाभावी, धार्मिक तसेच शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी विविध १५ संस्था, संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संत निरंकारी, स्वामी नारायण ट्रस्ट, मुक्त विद्यापीठ, जॉगर्स क्लब, किरण चव्हाण, गोपाळ पाटील, इस्कॉन, राष्ट्रसेवा समिती, पर्यावरण गतिविधी, सिटीकनेक्ट या संस्थांनी महापालिकेला प्रतिसाद दिला आहे.