नाशिक : ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा उद्या महामोर्चा
नाशिक : आडगाव नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनसच्या जागेवरून इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करावे, इंदोरच्या धर्तीवर ट्रान्स्पोर्टनगर म्हणून विकसित करावे, ट्रक टर्मिनसमधून श्वान निर्बिजीकरण थांबवावे, शहरातील टेम्पो स्टॅण्डची जागा कायम करावी, परिवहन विभागाच्या वाहन पासिंगच्या जाचक अटी शिथिल कराव्यात, महाराष्ट्राचे चेक पोस्ट बॉर्डर बंद करावेत आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनकडून गुरुवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चाला जिल्ह्यातील सात संघटनांनी पाठिंबा दिला असून, कामबंद आंदोलनातून मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा संघटनांचा प्रयत्न आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देताना सांगितले, 'शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा, वाहतूकदार, चालक यांना औद्योगिक वसाहतीत तसेच ट्रक टर्मिनसमध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण करून त्यात योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. परंतु, प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजनांबाबत अनुकूलता दर्शविली जात नसल्याने, आम्ही मोर्चा काढत आहोत. या मोर्चातून शासनाने मागण्यांचा विचार करावा, हीच अपेक्षा. महामोर्चा गुरुवारी (दि. ४) सकाळी १० वाजता गोल्फ क्लब येथून काढण्यात येणार आहे. मोर्चाला सात वाहतूकदार संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून, त्यांचे सभासददेखील माेर्चात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, याप्रसंगी असोसिएशनचे सचिव शंकर धनावडे, श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक, अजय बागूल, मामा राजवाडे, प्रवासी वाहतूक संघटना किशोर लोखंडे, ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे अंजू सिंगल, चालक-मालक मोटर संघटनेचे सचिन जाधव, रिक्षा युनियनचे अध्यक्ष हैदर शेख, ट्रान्स्पोर्ट संघटनेचे राम सूर्यवंशी, हरनारायण अग्रवाल, ईदरपाल चड्डा आदी उपस्थित होते.
या मागण्यांसाठी माेर्चा
ट्रक टर्मिनसच्या जागेवरून इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करा.
ट्रक टर्मिनसस्थळी सुरक्षित वाहनतळ, व्यावसायिकांसाठी गाळे, गॅरेज, सारथी सुविधांसाठी केंद्र असावे.
शहराच्या चारही दिशांनी बंद पडलेले जकात नाके ट्रक टर्मिनस म्हणून विकसित करावे.
अंबड एमआयडीसीमधील ट्रक टर्मिनस संघटनेला ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालवायला द्यावे.
शहरातील टेम्पो स्टॅण्डची जागा कायम करावी.
द्वारका येथे भुयारी मार्गे दुचाकी, रिक्षाची वाहतूक सुरू करावी.