नाशिक : शासन दरबारी विविध मागण्या मांडूनही पदरी आश्वासनेच पडत असल्याने नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने येत्या ४ जुलै रोजी नाशिक बंदची हाक दिली आहे. यावेळी सकाळी १०.३० च्या सुमारास गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या या बंदला मोटर, मालक, कामगार, वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
आडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनसच्या जागेवर इलेक्ट्रिक बस डेपो उभारला जात असून, त्याला वाहतूक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविल्याने गेल्या दहा दिवसांपासून त्याचे काम थांबविले आहे. मात्र, हा डेपो येथून त्वरित स्थलांतरित करावा, ही वाहतूक संघटनेची मागणी कायम आहे. दरम्यान, या जागेवर इंदूरच्या धर्तीवर (ट्रान्स्पोर्ट नगर) ट्रक टर्मिनस विकसित करावे, ट्रकसाठी सुरक्षित वाहनतळ, वाहतूक व्यावसायिकांसाठी गाळे, गॅरेज स्पेअर पार्टसाठी व्यवस्था व सारथी सुविधा केंद्र असावे या मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका हद्दीतील शहराच्या चारही दिशांना बंद पडलेली जकात नाके ट्रक टर्मिनस म्हणून विकसित करावे, अंबड एमआयडीसीमध्ये होत असलेले ट्रक टर्मिनल संघटनेला ना नफा ना तोटा या तत्वावर चालवायला द्यावे, शहरातील टेम्पो स्टॅण्डची जागा कायम करावी, द्वारका येथील सर्कल काढून रस्ता ओलांडण्यासाठी बनवलेला भुयारी मार्ग दुचाकी, रिक्षासाठी चालू करावा, नाशिक रोडकडून येणारी वाहतूक इंदिरानगर, टाकळीकडे बंद करून व्दारकावर आणावी, डॉ. आंबेडकर ट्रक टर्मिनलमधून श्वान निर्बिजीकरण थांबवावे, परिवहन आरटीओ विभागाद्वारे गाडी पासिंगसाठीच्या जाचक अटी शिथील कराव्यात, महाराष्ट्राचे चेक बोस्ट बॉर्डर बंद करावेत, आदी मागण्यांसाठी हा बंद असणार आहे.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या या बंदला मोटर, मालक, कामगार वाहतूक संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून, आमची संघटना पूर्ण ताकदीने या आंदोलनात सहभागी होणार आहे. वाहतूक संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने सकारात्मक विचार करावा, हीच अपेक्षा.
- सचिन जाधव, अध्यक्ष, मोटर, मालक, कामगार वाहतूक संघटना