

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळाले असून, पीएम ई-बस योजनेअंतर्गत नाशिक सिटिलिंक आणि जेबीएम इकोलाइफ मोबिलिटी प्रा. लि. यांच्यात ५० अत्याधुनिक वातानुकूलन इलेक्ट्रिक बस पुरवण्यासाठी १० वर्षांचा करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नाशिककरांना आधुनिक, सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक बससेवा उपलब्ध होणार आहे.
महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महापौर कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करारानाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महायुतीचे नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हा करार करण्यात आला.
करारानुसार जेबीएम इकोलाइफ मोबिलिटी कंपनीकडून बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, तांत्रिक सेवा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामुळे महापालिकेवरील आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या ई-बसमुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन इंधन खर्चात बचत होईल. तसेच कार्बन उत्सर्जनाची घट झाल्याने शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासही मदत होऊन स्वच्छ व हरित नाशिकच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.
यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, भाजप गटनेते ॲड. श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादीच्या गटनेत्या सीमा ठाकरे, रंजन ठाकरे, उबाठा गटनेते केशव पोरजे, सिटिलिंकचे सीईओ डॉ. विजयकुमार मुंडे आदी उपस्थित होते.
करार अंतिम झाल्यानंतर आता ई-बसेस नाशिकच्या रस्त्यावर धावण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. करारानुसार जेबीएम कंपनीकडून बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, तांत्रिक सेवा तसेच आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. ई-बसमुळे कार्बन उत्सर्जनावर घट होऊन शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासही मोठी मदत होणार आहे. हा करार स्वच्छ, सुंदर, हरित नाशिकच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
"आगामी सिंहस्थात लाखो भाविक आणि पर्यटकांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पीएम ई-बस योजनेंतर्गत सिटिलिंकच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ५० अत्याधुनिक ई-बस महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि भविष्योन्मुख होण्यास मोठी मदत होईल."
– हिमगौरी आहेर-आडके, महापौर, नाशिक