नाशिक : ठेकेदारासाठी घनकचरा व्यवस्थापन संचालकांचा पदभार काढला

नाशिक महानगरपालिका : महापालिकेत पुन्हा ’रात्रीस खेळ चाले’; प्रशासनाची भूमिका संशयास्पद
नाशिक महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका file photo
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत अनागोंदी कारभार सुरूच असून, 176 कोटींच्या सफाईच्या ठेक्याला चाल देण्यासाठी रातोरात डॉ. आवेश पलोड यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदाचा पदभार काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर व मालेगाव महापालिकांमध्ये सफाईचा ठेका असलेल्या ठेकेदारासाठी एका मंत्र्याच्या कथित आशीर्वादाने हा सारा बनाव रचला गेल्याची महापालिका वतुर्ळात चर्चा आहे.

मनुष्यबळाचा अभाव आणि नोकरभरतीस शासनाने लावलेला ब्रेक यामुळे नाशिक महापालिकेने शहरातील सफाई कर्मचार्‍यांचे आउटसोर्सिंग केले आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट 2020 पासून बाह्यअभिकर्त्यांमार्फत 700 सफाई कर्मचार्‍यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षभरापासून या ठेक्याची मुदत संपली असून, नवीन निविदा प्रक्रिया झालेली नाही.

पुढील पाच वर्षांसाठी प्रमुख रस्त्यांसह शाळा, नाट्यमंदिर, सभागृह, जलतरण तलाव यांची स्वच्छता करण्यासाठी 176 कोटी खर्चातून पाच वर्षांचा ठेका दिला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला महासभेने फेब्रुवारी महिन्यात मंजुरी दिली होती. परंतु त्यास 10 महिने झाले तरी निविदा प्रक्रिया सुरू झाली नव्हती. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी संबंधित ठेक्यासाठी निविदा प्रसिद्ध होणे अपेक्षित होते.

नातेवाइकाचे निधन झाल्यामुळे डॉ. पलोड यांनी शुक्रवारी (दि. 11) एका दिवसाची रजा घेतली होती. ही संधी साधत विशिष्ट ठेकेदारासाठी डॉ. पलोड यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार पर्यावरण विभागाचे उपआयुक्त अजित निकत यांच्याकडे सुपूर्द केला गेला. निविदा अपलोड करण्यासाठी ‘डिजिटल की’ अर्थातच चावीही निकत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकारामुळे मात्र महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका सफाई ठेक्यासाठी 'मन्नूभाई'ला पायघड्या?

सफाई ठेक्यात या कामांचा समावेश

या ठेक्यात नाशिक पूर्व विभाग तसेच पूर्वकडील गंगा-गोदावरी घाटगौरी पटांगण अहिल्याबाई होळकर पूल ते कपिला संगम घाट परिसर, नाशिक पूर्व भागातील महापालिकेच्या सर्व शाळांमधील शौचालये, आस्थापना, विभागीय कार्यालय, महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, मनपाची सर्व नाट्यगृहे, सभागृह, जलतरण तलाव, संपूर्ण नाशिक पश्चिम विभाग तसेच नाशिक पूर्व नाशिक पश्चिमेकडील पंचवटी घाटालगतचा भाग या ठिकाणची साफसफाई व स्वच्छता केली जाणार आहे. 175 कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी विशेष स्वच्छता करतील, तर 700 कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता करतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news