नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर गुरुवार (दि. ५) पासून जिल्ह्यातील एसटी बसची चाके पूर्वपदावर आली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संपामुळे जिल्ह्यात दोन दिवसांत एसटीच्या सुमारे चार हजार फेऱ्या रद्द झाल्या. परिणामी, महामंडळाचे अंदाजे दोन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
मूळ वेतनात वाढ करावी, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी संपाचे हत्यार उपसले. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संप झाल्याने लाखो प्रवाशांचे हाल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी यशस्वी शिष्टाई केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची घसघशीत वाढ करताना १ एप्रिल २०२० पासून ती लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र, संपाच्या दोन दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाला मोठा आर्थिक फटका बसला.
जिल्ह्यातील 14 आगारांमधील कर्मचारी संपात सहभागी होते. त्यामुळे दोन दिवसांपासून एसटी बसेस जागेवरच उभ्या होत्या. परिणामी सुमारे चार हजार फेऱ्या रद्द करण्याची वेळ एसटी प्रशासनावर ओढवली. दरम्यान, बुधवारी (दि. ४) रात्री उशिरा संप मागे घेतल्यानंतर नाशिकमधील 14 ही आगारांमधून टप्प्याटप्प्याने बससेवा पूर्ववत सुरू झाली. तसेच पहाटेपासून विविध मार्गावर नियमितपणे बसेस धावू लागल्या. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घरी परतणाऱ्या प्रवाशांनी एसटी स्थानकांमध्ये एकच गर्दी केली.
कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर शहरातील नवीन मेळा, ठक्कर बाजार, महामार्ग व जुने सीबीएस हे आगार प्रवाशांच्या गर्दीने गजबजले. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव आदी मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक होती. जिल्ह्यातील निरनिराळ्या आगारांमधून बसगाड्या बाहेर पडल्याने ग्रामीण जनजीवन पूर्ववत होण्यास मदत झाली. मात्र, संपाच्या दोन दिवसांत प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बसेस उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांनी जादाचे पैसे मोजत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी गावी जाणे पसंत केले.