नाशिक : सण-उत्सवांच्या तोंडावर पुन्हा एकदा एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवार (दि. ३) पासून बेमुदत संप पुकारला आहे. यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील ११ कामगार संघटना सहभागी झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.
संपामुळे नाशिक १, २, पेठ, पिंपळगाव या चार डेपोंमधून बसेस बाहेर पडल्या नाहीत. कळवण, सटाणा, मालेगाव, कोपरगाव याठिकाणी तुरळक प्रमाणात एसटी सुरू होत्या. मंगळवारी (दि.3) दुपारी १२ च्या दरम्यान एसटी कर्मचार्यांनी एनडी पटेल रोडवरील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने केली. यात सुमारे 250 ते 300 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवासी हवालदिल झाले आहेत. शहरातील ठक्कर बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी मालेगाव, त्र्यंबक, अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा, खामगाव, शेगाव, जळगाव, मनमाड, नांदगाव याठिकाणी एसटीने प्रवास करतात. संपामुळे बसेस डेपोतच थांबल्याने प्रवाशांचे हाल झाले. चौकशी खिडकीवर प्रवासी गर्दी करीत होते, मात्र तेथे माहिती देणारे कर्मचारीच नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
मेळा बसस्थानकातून दर अर्ध्या तासाला पुण्याकडे ई-शिवाई, शिवशाही बस रवाना होत असते. पहाटे 4.30 पासून रात्री 10.30 पर्यंत नाशिक-पुणे एसटी सेवा सुरू असते. मात्र, मंगळवारी संपामुळे बसेस स्थानकातून बाहेरच पडल्या नसल्यामुळे प्रवासी खोळंबले होते. अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अखेर अनेकांनी खासगी प्रवासी वाहनांकडे धाव घेतली.
एरवी हजारो प्रवाशांची वर्दळ असणारे ठक्कर व मेळा बसस्थानक संपामुळे सामसूम होत गेले. केवळ 100 ते 150 प्रवासी एसटीची वाट पाहात होते. विशेषत: महिला प्रवासी ताटकळल्या एसटी नसल्याने नाराज होऊन माघारी परतल्या. मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकातही असेच चित्र होते. मुंबई, बोरिवली, कसारा, शहापूर, ठाणे, वसई, कल्याण, डोंबिवली या मार्गांवरील प्रवाशांनी कसारा रेल्वेस्थानकाचा पर्याय निवडल्याचे दिसून आले.
मेळा बसस्थानकात पहाटे 4.30 पासून प्रवासी येत असतात. मात्र संपामुळे प्रवाशांची संख्या घटली. पुण्यासाठी सकाळपासून केवळ ११ ई-शिवाई सोडण्यात आल्या. बसेस नसल्याने प्रवासी नाराज होत असले, तरी आमचा नाईलाज आहे.
परमेश्वर रावणकोळे, वाहतूक निरीक्षक, मेळा बसस्थानक, नाशिक.
पिंपळगाव बसवंत : एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये पिंपळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवित गाड्या बंद ठेवल्याने प्रवाशांचे फारच हाल झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आल्याने या वाहनधारकांनी प्रवाशांची लूटमार केली.
एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत राज्यस्तरावर बोलणी सुरू असून, लवकरच संपावर तोडगा निघेल अशी आशा आहे. एसटी कर्मचार्यांनी सेवेत परतावे, असे आवाहन एसटी कर्मचारी कृती समितीला केले आहे.
अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नाशिक
मनमाड : एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याची संधी साधत खासगी प्रवासी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली आहे. याचा सर्वसामान्य प्रवाशांबरोबर विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांना देखील फटका बसत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील नियमित प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. येथील आगारातून रोज शंभरहून अधिक बसेस धावतात. त्यात ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटींची संख्या मोठी आहे. शिवाय इतर राज्य व शहरातून ही अनेक लांब पल्ल्याच्या बसेस या स्थानकावरून ये-जा करतात. या सर्व थांबल्याने स्थानकावर शुकशुकाट पहायला मिळाला. शासनाने संपावर तातडीने यावर तोडगा काढून बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
२० ऑगस्टलाच संप पुकारण्यात येणार होता. मात्र ७ ऑगस्टला बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ३ सप्टेंबरपर्यंत आम्ही वाट बघितली. शासनाकडून मागण्या मान्य होत नसल्याने आम्ही संप पुकारला आहे.
स्वप्निल गडकरी, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, नाशिक.
नाशिक विभागात मंगळवारी (दि. ३) रात्री १२ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘एसटी’च्या एकूण २८०० फेर्या रद्द झाल्यात. यामुळे महामंडळाचे अंदाजे ५३ लाखांचे नुकसान झाले आहे. विभागात एसटीच्या सेवेत १७४१ चालक, तर १५८७ वाहक आहेत. एकूण ३३२८ कर्मचार्यांपैकी ९५ टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्याने एकूणच व्यवस्था कोलमडून पडली आहे.
लासलगाव : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारल्याने 'लालपरी'ची चाके आगारात खिळली. लासलगाव बस आगारातील संयुक्त कृती समितीचे सुमारे १५० हून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, मंगळवारी दुपारी ११ नंतर सर्व बसफेऱ्या बंद करण्यात आल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लासलगाव आगारातून दररोज २८८ बसफेऱ्या होतात. त्यातून आगाराला पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दरम्यान, बसफेऱ्या बंद झाल्याने नियमित प्रवासी आणि विद्यार्थ्यांची कमालीची गैरसोय झाली.
येवला : येथे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम चार जिल्ह्यांच्या मध्यवर्ती मुख्य बसस्थानक असलेल्या येवला आगारावर जाणवत असून, रात्री १२ नंतर एकही बस आगारातून न निघाल्याने प्रवाशांची कमालीची गैरसोय होत आहे. येवला आगारातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, त्यानंतरच हे आंदोलन मागे घेतले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.