नाशिक :
"गौर आली गौर, कशाच्या पावलांनी,
सोन-रूपाच्या पावलांनी;
आली तर येऊ द्या सोनपावली होऊ द्या!"
माहेरवाशिणी गौराईचे मंगळवारी (दि. १०) घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले. गौराईंच्या आगमनाने घरात मांगल्य व चैतन्य पसरले आहे. महिला भाविकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे.
लाडक्या गणरायाच्या आगमन सोहळ्यानंतर अवघ्या भाविकांना आतुरता लागून असलेल्या गौराईचे आगमन अनुराधा नक्षत्रावर झाले. महालक्ष्मींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच महिलांची लगबग सुरू होती. घरात हळदी-कुंकवाची पावले काढत त्यावरून गौराईंना आणण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजन करत गौराईंची प्राणप्रतिष्ठापना केली गेली. पुढील दोन दिवस माहेरवाशिणी घरी पाहुणचार घेणार आहेत. बुधवारी (दि. ११) श्री महालक्ष्मींचे महापूजन करण्यात येणार आहे. यावेळी पुरणपोळी, करंजी-लाडू, सोळा प्रकारच्या भाज्या तसेच अन्य पदार्थांचा महानैवेद्य गौराईंना अर्पण केला जाईल. वर्षभरानंतर माहेरवाशिणी घरी आल्याने भाविकांमध्ये आनंद आहे. गौराईंच्या सेवेत कमतरता भासू नये यासाठी भाविक विशेषत: महिला वर्ग अधिक काळजी घेत आहे.
गौराई म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीस आवाहन केले जाते. गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहात स्वागत होते. राज्यात प्रांतनिहाय व कुलाचाराप्रमाणे गौराईंचे आगमन आणि पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रीतही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरीपूजन केले जाते, काही ठिकाणी सुगडावर (मकरसंक्रातीला वाण दिले जाणारे सुगड) नाक, कान, डोळे रेखाटून त्याची स्थापना करण्याची पद्धती आहे. तीन दिवस घरोघरी महालक्ष्मींचे मनोभावे पूजन केले जाते.