नाशिक : पंचगव्याने भिंत सारवून त्यावर अष्टगंधाने विलोभनीय असे गाैराईचे चित्र साकारण्याची परंपरा सातशे वर्षानंतरही बेळे कुटुंबियांनी जोपासली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विराजमान झालेल्या चित्रगौराईने निसर्ग संवर्धनाचा संदेश देताना 'वृक्ष लावा, वृक्ष जगवा' हा संदेश प्रतिकात्मक देखाव्यातून दिला आहे.
पूर्वीच्या काळी गौरी साकराताना घरातील भिंत पंचगव्याने सारवून त्यावर अष्टगंधाने गौरींचे विलोभनीय रूप साकारले जात असे. कालांतराने गौरी पुठ्यावर साकारल्या जावू लागल्या. त्या साकारताना अष्टगंध हा गुलाबपाण्यात मिसळला जायचा. त्यानंतर पांढऱ्या रंगाचा पाण्यात अलगद विरघळणारा विशिष्ट पुठ्ठा घेऊन त्यावर गौरीचे रूप साकारले जात होते. अष्टगंध रूपी गौरी साकारण्याची सातशे वर्षांची परंपरा आजही बेळे कुटुंबियांनी जोपासली आहे.
अष्टगंधाने गौरीचे रूप साकारल्यानंतर त्यावर दागिन्यांच्या साज चढवला जात असल्याने, चित्रगौरीचे विलोभनीय असे रूप दिसून येते. तर चित्रगौरीसमोर नारळाला गौरीच्या मुखवट्याप्रमाणे सजविले जात असून, हे मुखवटे तांदुळ आणि गव्हाच्या राशीवर ठेवले जात असल्याने, खऱ्या अर्थाने गौराई सोन पावलांनी येऊन संपन्नता आणि सुबत्तेचा संदेश देत असल्याची जाणीव होते. बेळे कुटुंबिय गौरी आगमनाचा उत्सव साजरा करीत असताना, सामाजिक जाणिवेतून समाजसंदेशही देण्याचा प्रयत्न करतात. यंदा निसर्ग संवर्धनाचा प्रतिकात्मक देखावा साकारून, 'वृक्ष लावा, वृक्ष जगवा' असा संदेश देण्यात आला आहे. अडीच दिवसांच्या गौराईच्या उत्सवात अनेक नाशिककर बेळे कुटुंबियांसोबत सहभागी होत असल्याने, गौराईचे आगमन खऱ्या अर्थाने नाशिककरांसाठी उत्सवी वातावरण निर्माण करणारे ठरते आहे.
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ५६ भाेगचा नैवेद्य सर्व देवतांना दाखविण्यात आला आहे. हा नैवेद्य बेळे कुटुंबियांशी जुडलेल्या सर्व कामगारांचा सन्मान करून प्रसाद म्हणून वाटप केला जाणार आहे. तसेच आप्तेष्ट मित्रमंडळींनाही प्रसाद म्हणून दिला जणार असल्याचे धनंजय बेळे आणि प्रेरणा बेळे या दाम्पत्याने सांगितले आहे. दरम्यान, हर्षद बेळे आणि अदिती बेळे यांच्या हस्ते पंचोपचार शोडस पूजा करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य वेदमुर्ती गोविंद पैठणी यांनी केले.
ज्यावेळी नाशिक शहर वसले, त्यावेळी केवळ चारच कुटुंब नाशिकमध्ये होते. त्यातील एक बेळे कुटुंब होय. त्याकाळी रविवार कारंजा येथे असलेल्या बेळे वाड्यात पेशव्यांचेही येथे येणे-जाणे होते. वाड्याच्या पुढील भागात त्याकाळी दरबार भरायचा. तर गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असे. वणीच्या सप्तश्रृंगी देवीसारखीच प्रतिकृती या वाड्यात आहे. अष्टगंधापासून गौरी साकारणारी बेळे यांची ही आठवी पिढी आहे.