

नाशिक : देशातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकचा संतुलित विकास होतो आहे. अनेक नागरिकांचे स्वप्न नाशिकला स्थायिक होण्याचे आहे. त्याप्रमाणेच उद्योग, व्यवसायांचा विस्तार होतो आहे. त्यामुळे गृहप्रकल्प, औद्योगिक क्षेत्रांसाठी जमिनीची मागणी कायम राहाणार आहे. नाशिकच्या सुरू असलेल्या या विकासात रियल्टर्सचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) या संस्थेतर्फे ‘७/१२ रियल्टर्स डे’ निमित्त महाअधिवेशन आयोजित केले होते. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे ७ डिसेंबरला आयोजित ‘रियल इस्टेट का महाकुंभ’ या अधिवेशनास सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राणचे अध्यक्ष राज तलरेजा, समिती समन्वयक राजेंद्र कोतकर यांनी प्रास्ताविक केले. सहभागी झालेल्या ५०० हून अधिक रिअल इस्टेट व्यावसायिकांचे त्यांनी आभार मानले. सारडा ग्रुपचे सीईओ आणि व्यवस्थापकीय भागीदार श्रीरंग सारडा यांनी मार्गदर्शन केले.
नाशिकमध्ये मुबलक जागा उपलब्ध आहे. याशिवाय येथील हवामान चांगले आहे. शैक्षणिक संस्थांमुळे या भागात मनुष्यबळ निर्मिती उत्तम होत आहे. अशा स्थितीत औद्योगिक प्रकल्पांचे विस्ताराचे धोरण रियल्टर्ससाठी महत्त्वाचे ठरू शकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी यांनी दळणवळणासंदर्भातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. पॅनल डिस्कशनमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, नरेडकोचे अध्यक्ष सुनील गवादे, अर्बन साइट्सचे संचालक भूषण कोठावदे, द ॲव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक मुकुंद साबू, नंदन बिल्डकॉनचे सीएमडी प्रसन्ना सायखेडकर तसेच नरेडकोचे कार्यकारिणी सदस्य श्यामकांत कोतकर यांनी सहभाग घेतला. आयमाचे अध्यक्ष ललित बुब, सोमा वाइन व्हिलेजचे सीएमडी प्रदीप पाचपाटील, मानवता हेल्थ कॅम्पसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राज नगरकर, इंडस्ट्रीयल कल्स्टर डेव्हलपमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ विक्रांत मते, क्रेडाई नाशिक मेट्रोचे सचिव तुषार संकलेचा, अविनाश शिरुडे यांनी संवाद साधला.