

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिन्नरचे नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर याला अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
सिन्नर येथील शेतजमिनीच्या प्रकरणांत फेरफार करण्यासाठी नायब तहसीलदार धनगर याने लाच मागितली होती. तक्रारदाराने ३ हेक्टर ६० आर शेतजमीन खरेदी केली होती. खरेदी खतावरुन दोडी खुर्दचे तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंद रद्द होण्यासाठी दिलेल्या तक्रारीचा निकाल तक्रारदाराच्या मुलासह सुनेच्या बाजुने लावुन देत त्यांचेकडे सुनावणीकामी असलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे ६ डिसेंबरला १० लाखांची लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती अडीच लाख रुपये लाचेची रक्कम स्किारण्याचे मान्य केले. ९ डिंसेंबरला सापळा रचत आरोपी नायब तहसीलदारास नाशिकमधील सोपान हॉस्पिटलसमोर लाचेची अडीच लाखांची रक्कम पंचासमक्ष स्विकारताच रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार संदीप वणवे, प्रमोद पाळदे, शरद हेंबाडे, युवराज खांडवी यांनी पार पाडली.
महसूल विभागाची प्रतिमा मलिन
सिन्नरमधील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचाराची प्रकरणे सध्या चर्चेत आहे. ४ नोव्हेंबरला मंडल अधिकारी पांडुरंग तुकाराम गोतीसे, प्रदीप लक्ष्मण तांबे, तलाठी राहुल कालबोगवार व नागरिक सुनील अशोक शिंदे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना तहसील कार्यालयासमोरच रंगेहात पकडण्यात आले होते. या आरोपींना एक महिना तुरुंगवास झाला होता. या आरोपींना नुकताच जामीन मिळाला आहे. या घटनेला एक महिना उलटत नाही तोच नायब तहसीलदार संजय धनगर यास अडीच लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. त्यामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे.