नाशिक : तपोवनातील साधुग्रामच्या जागेतील प्रस्तावित १,८२५ वृक्षतोडीविरोधातील आंदोलनात सहभाग घेत मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपची कोंडी केल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमातही या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहात अघोषित बहिष्कार टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ, ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांनीही वृक्षारोपण तसेच ई - भूमिपूजन कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने महायुतीतील बेबनाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.
तपोवनातील साधुग्रामच्या जागेतील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा देशपातळीवर गाजत आहे. या जागेवर साधुग्रामच्या नावाखाली महापालिकेने पीपीपी तत्त्वावर २२० कोटींच्या औद्योगिक प्रदर्शनी केंद्राची निविदा काढल्यामुळे वृक्षप्रेमींसह राजकीय पक्षांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने या वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी आंध्र प्रदेशातील राजमुंद्रीहून 10 ते 15 फुटांची 15 हजार झाडे आणली असून, त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा प्रारंभ पंचवटीतील मखमलाबाद परिसरात सोमवारी (दि. १५) पार पडला.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भाजपच्या आमदारांसह शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री ॲड. माणिक कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खा. राजाभाऊ वाजे, सरोज आहिरे, किशोर दराडे, सत्यजित तांबे, पंकज भुजबळ यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, महायुतीतल्या घटक पक्षांनी भाजपच्या या डॅमेज कंट्रोल कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.
भाजपची डोकेदुखी वाढली
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीचा मुद्दा नुकसानकारक ठरण्याची शक्यता असल्याने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपच्या वृक्षारोपण कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे बोलले जाते. त्यामुळे विरोधकांना कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव मात्र फसला.
'श्रेय तुम्हाला, मग बदनामीही तुम्हीच घ्या'
महायुतीत तीन मित्र पक्ष असतानाही कुंभमेळ्यातील विकासकामांचे श्रेय भाजप घेत आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात भाजप वगळता अन्य घटक पक्षांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यामुळे श्रेय तुम्ही घेता, मग आता रोष आणि बदनामीही तुम्हीच घ्या. आम्ही यापासून दूरच राहणार, अशी भूमिका मित्रपक्षांनी घेतल्याची चर्चा आहे.