

नाशिक : आगामी कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील १,८०० वृक्षांवर प्रशासनाकडून कुऱ्हाड चालविली जाणार असल्याने त्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी 'झाडे वाचवा, तपोवन वाचवा' ही मोहीम हाती घेतली आहे. ती केवळ नाशिकपुरती मर्यादित न राहता देशपातळीवर पोहोचली आहे. चळवळीच्या स्मरणार्थ यापुढे १८ नोव्हेंबर हा दिवस 'तपोवन दिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याचा निर्धार पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा 'हरित कुंभ' म्हणून साजरा करणार असल्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली असली, तरी प्रत्यक्षात हरित मंथनाची सुरुवात तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी उभ्या राहिलेल्या जनचळवळीतून झाली आहे. अनेक पर्यावरणवादी संस्था झाडे वाचविण्यासाठी पुढे आल्या आहेत. तपोवन सध्या आंदोलनाचे केंद्रबिंदू झाले आहे. याठिकाणी रोज लेखन, गीत, पोवाडे यांसह विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत.
निसर्ग संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला जात आहे. या चळवळीच्या आठवणी जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांपर्यंत पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचविण्यासाठी 'तपोवन दिन' म्हणून साजरा केला जावा, असा ठराव पर्यावरणप्रेमींनी केला. यावेळी पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, हृषिकेश नाझरे, रोहन देशपांडे, विशाल पाटील, वैशाली दळवी, आनंद रॅाय, महाराष्ट्र माझा परिवाराचे अध्यक्ष विकास भागवत, सदा जाधव यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी उपस्थित होते.