Nashik Tapovan Tree Cutting : वृक्षतोडीबाबत उध्दव-राज ठाकरेंची भेट घेणार : महाजन
नाशिक : साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील एकही जुने झाड तोडले जाणार नाही. काही छोटी-मोठी झाडे तोडावी लागतील. यासंदर्भात उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्याशीही चर्चेची माझी तयारी आहे, असे स्पष्ट करत वृक्षप्रेमी आणि राजकीय नेत्यांची जी भूमिका आहे. तीच आमची भूमिका असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थासाठी साधुग्राम उभारणीकरीता तपोवनातील प्रस्तावित १ हजार ८२५ वृक्षतोडीवरून रणकंदन माजले आहे. महापालिकेच्या या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेत तपोवनात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. तपोवनातील एकही झाड तोडू दिले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लाभले आहे.
कुंभमेळा मंत्री महाजन यांनी यावर भाष्य केले आहे. महाजन म्हणाले की, आम्ही पंधरा हजार झाडे नाशिकमध्ये लावू, तपोवनातील झाडांची पुनर्लागवड करू. साधूग्राम येथे एकही झाड आम्ही तोडणार नाहीत. काही जी छोटी मोठी झाडे आहेत, ती कापावी लागतील. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा चर्चा मी करेल. त्यांचे जे काही ऑब्जेक्शन आहे, त्यावर आम्ही चर्चा करू. वृक्षप्रेमी आणि राजकीय नेत्यांची जी भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे. आधी आम्ही या वृक्षप्रेमींना १५ हजार झाडे दाखवू. त्यानंतरच आम्ही पुढे जे काही करायचं तो निर्णय घेऊ, असे महाजन यांनी सांगितले. सयाजी शिंदे यांच्यासोबत सुद्धा माझी चर्चा झाली. मी जेव्हा हैदराबादला होतो, तेव्हा त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांची भूमिका मी समजून घेतली आहे, असे महाजन यांनी सांगितले.
राजमुद्री येथून रोपे आणणार
वृक्षतोडीविरोधातील पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील विविध ठिकाणी तब्बल 15 हजार झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दक्षिण भारतातील राजमुद्री येथून ही रोपे आणण्यात येणार आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः राजमुद्री येथे भेट देत अंदाजे 15 फूट उंचीची सुमारे 15 हजार देशी झाडे लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींची निवड केली आहे. ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून या झाडांची देखभाल मनपा उद्यान विभागामार्फत केली जाणार आहे. यातील पहिली एक ते दोन हजार झाडांची खेप येत्या आठवड्यात नाशिकमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे.
सयाजी शिंदे- राज ठाकरे भेट
नाशिकमधील वृक्षतोडीबाबत अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सोमवारी (दि.८) मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे देखील उपस्थित होते. या दोघांमधील चर्चेचा तपशील मात्र, कळू शकला नाही. नाशिकमध्ये मनसेनेही वृक्षतोडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि सयाजी शिंदे एकत्र येऊन तपोवनातील लढा आणखी तीव्र करणार का, हे बघावे लागेल.

