

नाशिक : वृक्षतोडीच्या निर्णयामुळे तपोवनात सध्या पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने आंदाेलन केले जात आहे. यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. शनिवारी (दि. २९) आंदोलन केले जात असताना, काही वृक्षांवर चिठ्ठ्यांच्या पुंगळ्या दोरीच्या सहाय्याने बांधल्याचे आढळले. जादूटोणा करण्याच्या हेतूने या चिठ्ठ्या बांधल्या असाव्यात, असा अंदाज अंनिस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, याबाबत त्यांनी नागरिकांचे प्रबोधन केले.
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याला इतर संघटनांप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाठिंबा दिला आहे. आंदोलनासाठी शनिवारी (दि. २९) अनेक संघटनांचे कार्यकर्ते तपोवनातील जंगलात आले होते. अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे तिथे होते. चिपको आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी एका वृक्षाला मिठी मारली. त्यावेळी वृक्षाला चिठ्ठ्यांच्या पुंगळ्या अडकवलेल्या दिसल्या. त्या दोरीने वृक्षाला बांधलेल्या होत्या. त्याबद्दल संशय आल्यावर त्यांनी पुंगळी उघडून पाहिली असता त्यात १५ ते २० चिठ्ठ्या आढळल्या. त्यावर उर्दूसारख्या भाषेत नकाशा व मजकूर लिहिलेला होता. मुस्लीम बांधवांकडून पडताळणी केली असता, ते अरबी भाषेत लिहिलेले असल्याचे समजले. सोबत तावीज असल्याने जादूटोणा असल्याची खात्री पटली. चांदगुडे यांनी आपले सहकारी राजेंद्र फेगडे व प्रल्हाद मिस्त्री यांच्या नजरेस ही बाब आणून दिली. प्रसार माध्यमांसमोर अंनिस कार्यकर्त्यांनी ते झाडापासून काढून घेत उपस्थितांचे प्रबोधन केले.
जादूटोणा करण्याचा उद्देश
कोणीतरी परप्रांतीय भोंदू मुल्ला मौलवींनी कदाचित हे कृत्य केल्याचा संशय आहे. एखाद्याचे भले किंवा दुश्मनाचे वाईट करण्याच्या उद्देशाने हा जादूटोणा केला असावा, असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. परंतु, अशा कृत्याने व्यक्तीच्या जीवनावर कोणताही चांगला अथवा वाईट परिणाम होत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. हे कृत्य जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र, हे कृत्य अनेक महिन्यांपूर्वी केले असावे. कोणी केले हे शोधणे अवघड आहे. त्यामुळे हे काढून घेत प्रबोधन करणे गरजेचे होते.
या प्रकरणाचा वृक्षातोडविरोधी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. हे अनेक महिन्यांपूर्वी केलेले असावे. लोकांनी अशा प्रकारच्या भोंदूंपासून सावध राहावे. कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी अथवा अंनिसशी संपर्क साधावा.
कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस