नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार नवा राजकीय एल्गार

नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार नवा राजकीय एल्गार

जानोरी (नाशिक): पुढारी वृत्तसेवा – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक रविवार (दि.१६) स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या या पहिल्याच बैठकीत लोकसभेतील पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली. तसेच भविष्यकालीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनाची व राजकीय भूमिका काय असणार यावर विचार मंथन करण्यासाठी येत्या 22 व 23 जूनला बारामतीत राज्य कार्यकारिणीची व्यापक बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

गेली 25 वर्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत संघर्ष करत आलेली आहे. राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऊस दरामध्ये मोठा फायदा झाला. म्हणून हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना दोन वेळेस खासदार केले. परंतु याच शेतकऱ्यांनी राजू शेट्टींचा दोनदा सलग पराभव देखील केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी लढत असताना, या निवडणुकीत राजू शेट्टींसह राज्यात स्वाभिमानीच्या उभ्या असणाऱ्या उमेदवारांना पराभव का बघावा लागला. आंदोलनात प्रचंड संख्येने शेतकरी सहभागी होतात. स्वाभिमानीमुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. मग तेच सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या वेळेस स्वाभिमानीला का बाजूला ठेवतात? यावर व्यापक चर्चा व्हावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनमताचा कौल लक्षात घेऊन नवी राजकीय भूमिका घ्यावी. यावर विचारमंथन करण्यासाठी बारामती येथे 22 व 23 जूनला दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होणार आहे. असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लोकसभेच्या निवडणुक स्वतंत्र चालण्याची भूमिका होती. कुठल्याही आघाडीत न जाता देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चार ते पाच लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद दिसून आली. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे तिथले निकाल अनपेक्षित लागले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कोल्हापूर जिल्ह्याने मागील विधानसभा निवडणुकीत अनुभवली आहे. स्वाभिमानी विरोधात असल्यामुळे एकही आमदार कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा निवडला नाही. यामुळे लोकसभेतला पराभव झाला असला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी झाली असे म्हणता येणार नाही. यामुळे बारामतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा काय एल्गार करते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

लोकसभेत राजू शेट्टींच्या पराभवाने आम्ही दुःखी झालो असलो तरी स्वाभिमानीचे मावळे खचलेले नाही. संपूर्ण राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्णायक अशी ताकद आहे. किमान 40 विधानसभा मतदारसंघात आम्ही निर्णायक आहोत. राजू शेट्टी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनांबद्दल जनतेमध्ये प्रचंड आदर आहे. यामुळे बारामतीत होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत आम्ही सखोल विचारमंथन करून नव्या जोमाने विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. मला खात्री आहे येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किमान 15 आमदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभेत दिसतील. – संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news