

लासलगाव : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या युरियाची परस्पर काळ्या बाजारात विक्री करण्याचा डाव लासलगाव पोलिसांनी उधळून लावला. विष्णुनगर येथे टाकलेल्या छाप्यात युरियाच्या गोण्यांसह टाटा कंपनीचा ट्रक असा तब्बल ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अनुदानित खताच्या काळ्याबाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर दगु पवार (३७, रा. इंदिरानगर, विंचूर) आणि सागर किशोर गरड (२७, रा. सुभाषनगर रोड, विंचूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी विष्णुनगर येथे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनुदानित केलेल्या युरियाचा साठा काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी युरियाच्या गोण्यांसह टाटा कंपनीचा ट्रक आणि इतर मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. शेतकऱ्यांसाठी अनुदानित असलेले खत बेकायदेशीररीत्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप संशयितांवर आहे.
या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२०२६ दाखल करण्यात आला असून, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३(२)(d), ७, ८, ९, १० तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना २ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अनुदानित युरियाचा साठा कुठून आणण्यात आला आणि तो कुठे विक्री केला जाणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.
या पथकात पोलीस हवालदार अरुण डोंगरे, ज्ञानेश्वर जाधव, निचळ, कांदाळकर, गोसावी तसेच पोलीस शिपाई संदिप डगळे, शशिकांत निकम, आरोटे, होंडे, सांगळे, तळेकर आणि घोलप यांचा समावेश होता. तर जिल्हा परिषद मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पगार, पंचायत समिती निफाडचे कृषी अधिकारी संदीप मोगल यांचा देखील समावेश होता.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत.