

सोलापूर : माढा तालुक्यातील मोडनिंब येथील गोदामामध्ये बनावट खत साठा असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने रेवण तनपुरे यांच्या रेवणसिद्ध अॅग्रो एजन्सी गोडाऊनवर छापा टाकून कारवाई केली आहे.
गोदामामध्ये बनावट इफको आणि पी. पी. एल. कंपनीच्या बॅगमधील रासायनिक बनावट खताचा साठा आढळून आला आहे. त्यामुळे खताचा पुरवठादार रामलिंग माळी, रा. बैरागवाडी व उत्पादक दीपक सस्ते, रा. ढवळेवाडी (ता. फलटण) यांच्या विरुद्ध राष्ट्रीयीकृत इफको व पीपीएलसारख्या खत उत्पादन करणार्या कंपनीच्या नावे विनापरवाना खते उत्पादन, विक्री करणे, साठवणुकीबाबतचा परवाना न घेणे, शासन व शेतकर्यांची दिशाभूल, फसवणूक केल्यामुळे खत नियंत्रण आदेश 1985 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, सदस्य सचिव बाळू बागल, अजय वगरे, सागर बारावकर, शरद गावडे, प्रवीण झांबरे, विलास मिस्किन, इफको कंपनीचे प्रतिनिधी रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात बनावट खत उत्पादन, विक्री होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून बनावट खत विक्री, उत्पादनावर नजर आहे. परंतु त्याविषयी तक्रारी फार कमी येत आहेत, त्यामुळे कृषी विभागाला बनावट खत उत्पादन, विक्री करणार्यावर कारवाई करण्यास अडथळा येत आहे. जिल्ह्यात शेतकरी, नागरिकांना बनावट खत आढळल्यास तत्काळ जिल्हा अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.