

नाशिक : पहिल्याच महासभेत अनियमित पाणीपुरवठा व रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नगरसेवकांनी चर्चेचा आग्रह धरल्यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी यासंदर्भात विशेष महासभा घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या पत्रावरून या मुद्द्यांवर चर्चेसाठी शुक्रवारी (दि. 6) दुपारी 12 वाजता विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रशासकीय राजवटीतील कारभारावर नाराज असलेले नगरसेवक आपली नाराजी आक्रमकपणे मांडण्याची शक्यता आहे.
मार्च 2022 मध्ये महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेवरील न्यायालयीन वादामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पावणेचार वर्षांनंतर महापालिकेची सातवी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या दरम्यान प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक नव्हते.
नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नव्हता. या कालावधीत शहरातील अनेक भागांत अनियमित पाणीपुरवठ्याचे प्रश्न निर्माण झाले. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणांत समाधानकारक साठा उपलब्ध असताना तसेच महापालिकेसाठी स्वतंत्र पाणीआरक्षण मंजूर असूनही अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. ही परिस्थिती शहरातील अनेक भागांत आजतागायत कायम आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.
घरगुती गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी एमएनजीएलने नियमबाह्यरीत्या खोदलेले रस्ते यासह स्मार्ट सिटी कंपनी व मोबाइल कंपन्यांनी फायर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी केलेली खोदकामे यांमुळे रस्त्यांची दैना झाली आहे. पावसाळ्यात याचा मोठा फटका नागरिकांना बसला. सद्यस्थितीत सिंहस्थकामे, एमएनजीएल, स्मार्ट सिटी व मोबाइल कंपन्यांनी रस्ते खोदल्यामुळे जिकडे तिकडे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
कायद्यातील तरतूद
महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार विशेष मुद्द्यांवर चर्चेसाठी स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या पत्रावर विशेष महासभा बोलावता येते. त्यानुसार स्थायी समिती सदस्य बाळा निगळ, योगेश गाडेकर, इंदुबाई खेताडे, सरिता सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या सभापती मच्छिंद्र सानप यांच्या पत्रावर अनियमित पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्ड्यांवर चर्चेसाठी शुक्रवारी (दि. 6) विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे.