

नाशिक : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिकची संकल्पना वास्तवात उतरविण्यासाठी मनपा आयुक्त मनीषा खत्री ॲक्शन मोडवर आल्या असून, वृक्षप्राधिकरणासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता तब्बल 25 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आले आहे. यात नवीन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाकरिता तब्बल 12.10 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे सुधारित तर 2026-27 या आर्थिक वर्षाचे 3011 कोटी 85 लाखांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सोमवारी(दि.2) आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केले. महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम 1975 मधील कलम 16 अन्वये नियमित अंदाजपत्रकाबरोबरच वृक्षप्राधिकरणाचे स्वतंत्र अंदाजपत्रक प्रतिवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार उद्यान विभागाने आयुक्तांमार्फत वृक्षप्राधिकरणाचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केले आहे.
25 कोटी 5 लाख रुपयांच्या या अंदाजपत्रकात लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी 3.53 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकासासह उभारल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांसाठी वृक्षतोड करावी लागत आहे. या वृक्षतोडीच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी या अंदाजपत्रकात तब्बल 8.57 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
या वृक्षांच्या संरक्षणासाठी एक कोटीच्या वृक्षसंरक्षक जाळ्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्याशिवाय जुन्या वृक्षसंरक्षक जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी 19 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. खत, माती खरेदीसाठी 25 लाख, नर्सरी बाबींसाठी 24 लाख, नर्सरी सुधारणेसाठी 2 लाख तर रोपे खरेदीसाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शोभेच्या कुंड्या खरेदीसाठी 25, हरितगृह, कंपोस्ट बेड उभारण्यासाठी 5 लाख, वृक्षलागवड अभियानांतर्गत जनजागृतीसाठी 5 लाखांची तरतूद आहे.
3.40 कोटी रुपये वृक्ष गणनेसाठी
दर पाच वर्षांनी शहरातील वृक्षगणना करणे बंधनकारक आहे. महापालिकेने आठ वर्षांपूर्वी वृक्षगणना केली होती. ही वृक्षगणना वादात सापडली होती. प्रशासकीय मंजुरी न घेता अतिरिक्त वृक्षगणना केल्याने वाद उभा राहिला होता. विशेष म्हणजे यात एकाच प्रजातीची 24 लाख वृक्ष दर्शविण्यात आल्याने संशय निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा वृक्षगणना गेली जाणार असून, त्यासाठी या अंदाजपत्रकात 3.40 कोटींची तरतूद करण्यात आली.
2.22 कोटी रुपये सिंहस्थ कामांसाठी
वृक्षप्राधिकरणाच्या अंदाजपत्रकात सिंहस्थविषयक तसेच नावीन्यपूर्ण कामांसाठी 2.22 कोटींची तरतूद आहे. याशिवाय वृक्षांच्या पुनर्रोपणासाठी 1.50 कोटी, वृक्षपुनर्रोपण वाहन व इतर साहित्य खरेदीसाठी 2.75 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जमा बाजूतील खर्च दर्शविताना सुरुवातीची 13.66 कोटींच्या शिलकेसह वृक्षनिधी परताव्यापोटी 5.06 कोटी, वृक्षनिधी परताव्यापोटी 2.75 कोटी, वृक्षसंवर्धन करापोटी 3.56 कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.