Nashik Sinner News | सिन्नरचे उद्योग अडचणीत; निमा पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

नाशिक : 'एमआयडीसी'चे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे यांना जाब विचारताना धनंजय बेळे व निमा पदाधिकारी.
नाशिक : 'एमआयडीसी'चे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे यांना जाब विचारताना धनंजय बेळे व निमा पदाधिकारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – एकलहरे येथील ५० एमव्हीएचे तीन ट्रान्सफार्मर जळाल्याने तीन दिवसांपासून नाशिक रोडसह नाशिक व सिन्नर तालुक्यातील ६० गावे अंधारात गेल्याने, त्याचा 'सिन्नर एमआयडीसी'तील उद्योगांना मोठा फटका बसला आहे. एमआयडीसीचा पाणीपुरवठा खंडीत झाल्याने, उद्योगांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, निमा पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत या विषयावरून एमआयडीसी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. संतप्त उद्योजकांचा रोष बघता, अधिकाऱ्यांनी तासाभरातच पाणीपुरवठा सुरळीत केला. दरम्यान, निष्क्रीय अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी करण्याची मागणी निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केली.

अपुऱ्या मूलभूत सुविधांमुळे अगोदरच सिन्नरमधील उद्योजकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात पाण्याचे पंप बंद पडल्याने, सलग तीन दिवसांपासून वसाहतीतील बहुतांश उद्योग बंद ठेवावे लागले. दरम्यान, सिन्नर निमाचे पदाधिकारी किरण वाजे, सुधीर बडगुजर, विश्वजीत निकम, प्रविण वाबळे यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. मात्र, अशातही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने, उद्योजकांनी निमा अध्यक्ष बेळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, कैलास पाटील या शिष्टमंडळासह एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे यांची भेट घेत सदर बाब निर्दशनास आणून दिली. तसेच एमआयडीसीतील निष्क्रीय अधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त करताना उद्योजकांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित केला. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार, उपअभियंता शशिकांत पाटील, सिन्नरचे क्षेत्रीय व्यवस्थापक योगेश पवार, एस. के. नायर यांना फैलावर घेत, पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावा अशी मागणी केली.

उद्योजकांचा संताप बघता, झांजे यांनी विद्युत विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधून पंप तातडीने सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर एक पंप तत्काळ सुरू केला. तसेच दुसरा पंपही काही वेळाच सुरू केल्याने, उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला.

मनोज पाटील यांची बदली करा

सिन्नर निमाचे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत सिन्नर कार्यालयात चांगले अधिकारी आणि कर्मचारी नेमावेत. कर्तव्यात कसूर करणारे उपअभियंता मनोज पाटील यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी केली. तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील जे सेक्टरसाठी आवश्यक असलेल्या रस्त्याकरिता १३.९२ हेक्टर औद्योगिक क्षेत्र वगळून रस्ता करावा, अशी मागणी ही केली. त्यास अधीक्षक अभियंता झांजे यांनी तत्काळ मुंबई मुख्यालयात फोन लावत जमीन विषयक व्यवहार बघणाऱ्या महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. निमा अध्यक्ष बेळे यांनी देखील महाव्यवस्थापकांशी चर्चा करीत, उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रश्न निर्दशनास आणून दिले. त्यामुळे हा प्रश्न सुटेल अशी उद्योजकांना अपेक्षा आहे.

पर्यायी जनित्राची व्यवस्था करावी

भविष्यात वीज खंडीतचा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पर्यायी जनित्राची व्यवस्था करावी, असे निमा पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना सूचविले असता यावर अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सांडपाण्याचा निचरा, वीजेचा लंपडाव, रस्त्यांची दुरावस्था हे प्रश्न सोडविण्याचेही झांजे यांनी आश्वासन दिले. सातपूर, अंबड एमआयडीसीतील नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आदी कामे पूर्ण करण्याची मागणी निमा पदाधिकाऱ्यांनी केली. त्यास झांजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे उद्योजकांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे निष्क्रीय अधिकाऱ्यांची उद्योग विभागाने तत्काळ उचलबांगडी करावी. सिन्नर एमआयडीसीत झालेला प्रकार गलथान कारभार दर्शविणारा आहे. सिन्नरसाठी स्वतंत्र फिडर द्यावा, अन्यथा निमातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल. – धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news