

नाशिक : बोगस शालार्थ आयडी प्रकरण गाजत असतानाच बेहिशेबी मालमत्ता व शिक्षकांची आर्थिक लूट प्रकरणी नंदुरबार शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांना निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी (दि.१०) विधानपरिषदेत आमदार किशोर दराडे यांनी त्यांना निलंबीतची मागणी केली. या मागणीला इतर आमदारांनीही साथ दिली. त्यामुळे शिक्षणाधिकारी अहिरे यांना तत्काळ निलंबीत करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली.
अहिरे यांनी नाशिक जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांची कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. नंदुरबार येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी अहिरे हे 2020 मध्ये पुणे येथे उपसंचालक असताना शिक्षकांची आर्थिक लूट करत कोट्यवधीची बहिशोबी मालमत्ता जमवली होती.
याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल असतानाही अहिरे नंदुरबारला शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आमदार दराडे यांच्यासह भाई जगताप, विक्रम काळे यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर, मंत्री भुसे यांनी शिक्षणाधिकारी अहिरे यांना निलंबित करत असल्याची घोषणा केली.