Nashik Sinhastha Kumbh Mela | सिंहस्थ 2027 : वेळ निसटतेय... आता कृतीचाच महाकुंभ हवा!

Nashik Sinhastha Kumbh Mela | सिंहस्थ 2027 च्या पूर्वतयारीचा आढावा; कामांचा वेग वाढवून गुणवत्तेवर भर देण्याची आणि पारदर्शक नियोजनाची गरज -
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 Pudhari News Network
Published on
Updated on

डॉ. राहुल रनाळकर

नाशिकच्या नशिबात दर बारा वर्षांनी एक सुवर्णसंधी येते, ती म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा. हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर नाशिकच्या विकासाला गती देणारा, जगाच्या नकाशावर शहराची ओळख अधिक ठळक करणारा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी पाहणारा महाउत्सव आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Thane Shiv Sena UBT protest : पालिका वृक्ष प्राधिकरणाविरोधात शिवसेना उबाठाचा एल्गार

२०२७ चा सिंहस्थ आता दारात येऊन ठेपला आहे. दिवसगणिक वेळ कमी होत आहे. मात्र शहरातील कामांचा वेग, नियोजनातील समन्वय आणि गुणवत्तेबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

राज्य शासनाने सिंहस्थासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्ते, पूल, उड्डाणपूल, नदी संवर्धन, घाटांचे सुशोभीकरण, मलनिसारण, पाणीपुरवठा, पार्किंग, सार्वजनिक सुविधा, आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियंत्रण अशा अनेक कामांना गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी वेळोवेळी आढावा बैठका घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस आणि विविध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ही सकारात्मक बाब आहे.

परंतु प्रश्न एवढाच आहे का, की कामे सुरू आहेत? की नाहीत. किती वेगाने? खरी चिंता आहे, ती त्यांच्या गुणवत्तेची आणि वेळेवर पूर्ण होण्याची.

आज नाशिकच्या अनेक भागांत रस्ते खोदलेले आहेत. पावसामुळे काही ठिकाणी चिखल, काही ठिकाणी पाणी साचलेले, तर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. नागरिक त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी हा रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे. व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. रुग्णवाहिकांनाही मार्ग काढताना अडचणी येतात. विकासकामे आवश्यक आहेत; पण नियोजनाचा अभाव नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे.

विकास म्हणजे केवळ काँक्रीट नव्हे. विकास म्हणजे लोकांचे जीवन सुसह्य करणे. सिंहस्थाच्या नावाखाली होणारी प्रत्येक वीट, प्रत्येक रस्ता, प्रत्येक पूल हा पुढील ३०-४० वर्षांचा विचार करून उभारला गेला पाहिजे. अन्यथा सिंहस्थ संपेल; पण समस्या कायम राहतील.

गोदावरी नदी ही सिंहस्थाचा आत्मा आहे. भाविक पवित्र स्नानासाठी येतात; पण नदीत मिसळणारे सांडपाणी, कचरा आणि प्रदूषण ही कटू वास्तवता आहे. नदी स्वच्छतेचे अभियान केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित राहून चालणार नाही. मलनिसारण प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालले पाहिजेत. नदीत एक थेंबही अशुद्ध पाणी जाऊ नये, ही प्रशासनाची प्राथमिकता असली पाहिजे.

सिंहस्थाच्या काळात वाहतूक व्यवस्थापन ही सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. लाखो वाहनांचा ओघ, भाविकांची गर्दी, आपत्कालीन सेवा, व्हीआयपी हालचाली आणि स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन यांचा समतोल राखणे हे मोठे आव्हान आहे. स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ड्रोन, सीसीटीव्ही आणि रिअल-टाइम नियंत्रण प्रणाली यांचा प्रभावी वापर अपरिहार्य आहे.

आरोग्य व्यवस्थेची तयारीही तितकीच भक्कम असावी लागेल. तात्पूर्ती रुग्णालये, डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका, औषधसाठा, संसर्गजन्य आजारांवरील नियंत्रण, अन्न व पाणी तपासणी आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद यासाठी स्वतंत्र कृती आराखडा हवा. लाखो भाविकांच्या आरोग्याशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सिंहस्थ म्हणजे केवळ श्रद्धेचा सोहळा नाही, तर अर्थव्यवस्थेची मोठी संधी आहे. हॉटेल व्यवसाय, पर्यटन, टॅक्सी, स्थानिक बाजारपेठ, हस्तकला, धार्मिक साहित्य, खाद्य व्यवसाय आणि लघुउद्योग यांना मोठी चालना मिळू शकते. मात्र या संधीचे योग्य नियोजन झाले, तरच स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. अन्यथा बाहेरील घटक फायदा घेऊन जातील.

प्रशासनाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल - सिंहस्थ हा फक्त शासनाचा कार्यक्रम नाही, तो नाशिककरांचा अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येक कामाची माहिती नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडली पाहिजे. कोणते काम किती टक्के पूर्ण झाले, किती निधी खर्च झाला, अंतिम मुदत काय आहे, याची माहिती सार्वजनिक असली पाहिजे. पारदर्शकता वाढली की, विश्वास वाढतो.

आज सिंहस्थाच्या तयारीचा वेग वाढवण्याची गरज आहे; पण त्या वेगात गुणवत्तेचा बळी जाऊ नये. घाईघाईत उभारलेले रस्ते, निकृष्ट दर्जाचे पूल किंवा अपूर्ण सुविधा सिंहस्थाच्या प्रतिमेला धक्का देतील. त्यामुळे 'वेळेत आणि उत्तम' हेच ब्रीदवाक्य असले पाहिजे.

सिंहस्थ २०२७ हा नाशिकसाठी केवळ धार्मिक कार्यक्रम नाही. तो शहराच्या भविष्यातील पायाभूत सुविधांचा पाया आहे. आज जे उभारले जाईल, त्याचा लाभ पुढील अनेक दशकांपर्यंत नागरिकांना मिळाला पाहिजे. हा निधी खर्च करण्याची नव्हे, तर नाशिक घडवण्याची संधी आहे.

वेळ अजून हातात आहे; पण ती वेगाने निसटत आहे. उद्या कामे अपुरी राहिली, तर कारणे सांगण्यापेक्षा आज कृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. सिंहस्थाच्या यशाचे श्रेय कोणा एका नेत्याला, अधिकाऱ्याला किंवा संस्थेला मिळणार नाही, तर ते संपूर्ण नाशिकच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ असेल.

सिंहस्थ हा श्रद्धेचा महाकुंभ आहे. आता त्याला कृतीचा महाकुंभ जोडण्याची वेळ आली आहे. कारण इतिहास घोषणा लक्षात ठेवत नाही, तो परिणाम लक्षात ठेवतो. आणि २०२७ मध्ये जग नाशिककडे पाहणार आहे - आपण त्या नजरेला अभिमानाने सामोरे जाणार की, अपुऱ्या तयारीची कारणे सांगणार, याचा निर्णय आजच्या कामांवर होणार आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 | खड्‌ड्यांच्या वेदनेवर सिंहस्थाचे स्वप्न उभे राहू नये!

श्रेयवादापेक्षा उत्तरदायित्वाला प्राधान्य द्यावे

लोकप्रतिनिधींनीही श्रेयवादापेक्षा उत्तरदायित्वाला प्राधान्य दिले पाहिजे. भूमिपूजन आणि उद्घाटनाचे फलक लावणे सोपे असते; पण काम दर्जेदार करून घेणे, ही खरी लोकप्रतिनिधित्वाची परीक्षा असते. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई झाली, तरच भविष्यात दर्जेदार कामांची अपेक्षा करता येईल. नाशिककरांचीही जबाबदारी कमी नाही. स्वच्छता राखणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, भाविकांना सहकार्य करणे आणि शहराची सकारात्मक प्रतिमा उभी करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सिंहस्थ यशस्वी होण्यासाठी प्रशासन आणि जनता या दोघांनी एकत्र काम केले पाहिजे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news