

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
तपोवनातील केवडीबन भागातील कृषी गो-सेवा ट्रस्टजवळ एका सुटकेसमध्ये गोणीत अत्यंत क्रूरपणे कोंबून फेकलेला व पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्राथमिक अंदाजानुसार, अज्ञाताने हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह येथे आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी तपोवन परिसरात विकासकामांत कार्यरत ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अचानक परिसरात तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, त्यांना एक संशयास्पद सुटकेस व गोणी दिसून आली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असून, त्यातून तीव्र दुर्गंधी सुटलेली होती. मृतदेह अनेक दिवसांपूर्वीचा असावा, तसेच मृत महिला ही ३५ ते ४० वयोगटातील असल्याचा अंदाज आहे.
मृतदेह पूर्णपणे छिन्नविछिन्न झाल्यामुळे मृत महिलेची ओळख होऊ शकलेली नाही. तपासाला योग्य गती व दिशा देण्यासाठी घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
या खुनाचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी पोलिस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.
- संजय पिसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आडगाव पोलिस ठाणे