

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टेररिस्ट फंडिंग आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणात सहभाग असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल महिनाभर घरातच नजरकैदेत ठेवत सायबर भामट्यांनी एक कोटी ५९ लाख ८२ हजार २०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गोविंदनगर परिसरात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ते २१ एप्रिल २०२६ दरम्यान फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला.
संबंधितांनी स्वतःला मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे सांगत, 'तुमच्या आधार व पॅन कार्डचा वापर करून कॅनरा बँकेतून टेररिस्ट फंडिंग व मनी लॉण्डरिंगचे व्यवहार झाले आहेत,' असा दावा केला. याचबरोबर 'तुम्हाला अटक करण्यात आली असून, ही डिजिटल अरेस्ट आहे. त्यामुळे घराबाहेर पडायचे नाही आणि कोणाशीही संपर्क साधायचा नाही,' असा दम देत सतत भीतीचे वातावरण निर्माण केले.
धमक्यांमुळे ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे घाबरून गेले. दररोज अनेक वेळा व्हिडिओ कॉलद्वारे चौकशीच्या नावाखाली त्यांचा मानसिक छळ करण्यात येत होता. 'तपासासाठी मुंबईला यावे लागेल, तोपर्यंत गुप्तता पाळा,' असे सांगून त्यांना एक प्रकारे एकाकी ठेवण्यात आले.
आरोपींनी स्वतःला वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत कडक आवाजात आदेश देणे, चौकशीचा बनाव करणे आणि कायद्याची भीती दाखवणे अशा युक्त्या वापरल्या. यामुळे फिर्यादी कोणाशीही संपर्क साधण्यास धजावत नव्हते. पुढे 'तुमच्या खात्याचे ऑडिट करायचे आहे, त्यासाठी सर्व रक्कम सिक्रेट सर्व्हिलन्स अकाउंटमध्ये जमा करा, तपास पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील,' असा विश्वास देण्यात आला.
भीतीपोटी फिर्यादीने स्वतः बँकेत जाऊन आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या खात्यांवर एकूण एक कोटी ५९ लाख ८२ हजार २०० रुपये वर्ग केले. व्यवहार करताना बँक अधिकाऱ्यांनी विचारणा केली असतानाही, आरोपीच्या दबावामुळे त्यांनी खरी माहिती लपवली, अशीही माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर त्यानंतरही आरोपींकडून पैशांची मागणी सुरूच होती. मात्र, फिर्यादीकडील रक्कम संपल्यानंतर भामट्यांनी अचानक संपर्क तोडला.
नियमित येणारे फोन बंद झाल्याने संशय बळावला. संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर फिर्यादीच्या मुलीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे करीत असून, बँक खात्यांची साखळी, व्यवहारांचे ठसे आणि संबंधित मोबाइल क्रमांकांचा तपास सुरू आहे.
असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही अशा प्रकारच्या डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहावे, अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नये आणि तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा - संजय पिसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
- संजय पिसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे