

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत महिलेला जादूटोण्याच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने विवाह आणि तीन वर्षे मानसिक शारीरिक छळ केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी यौवन भानुदास गोवाड (रा. दारणा सांगवी, ता. निफाड) याला अटक केली आहे.
पंचवटी परिसरात चहाचे दुकान चालविणाऱ्या पीडितेला व्यवसायात यश मिळवून देण्याचे आश्वासन देत, काही परिचितांनी तिची ओळख गोवाड याच्याशी करून दिली होती. त्याने मंतरलेले तांदूळ, कडक ऊद आणि जडीबुटीच्या पुड्यांच्या माध्यमातून जादूटोणा केल्याचा बनाव करून तिच्याकडून पैशांची उकळपट्टी केली.
त्यानंतर 'माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही, तर जादूटोणा करून तुला ठार मारेन,' अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. आधीच विवाहित असतानाही त्याने पीडितेशी जबरदस्तीने विवाह करून, तिला तीन वर्षे आपल्या ताब्यात ठेवत छळ केल्याचा आरोप आहे. पीडितेने घरात सुरू असलेल्या भोंदूगिरीला विरोध केल्यानंतर संशयिताने हिंसक भूमिका घेतली.
तीन चार दिवसांपूर्वी त्याने पीडित महिला आणि तिच्या अवघ्या एक वर्षाच्या मुलाचा गळा दाबून त्यांचा जीव घेण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यातून बचावल्यानंतर पीडितेने नातेवाइकांच्या मदतीने सायखेडा पोलिसांत धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या निर्देशांनुसार सायखेडा पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायदा, बलात्कारासह विविध गंभीर गुन्हे दाखल करून संशयिताला अटक केली.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री आणि कृष्णा चांदगुडे यांनी अशा प्रकारची फसवणूक झालेल्या इतर पीडितांनीही न घाबरता पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.