Sangli crime : ईश्वरपूरमध्ये सराईत चोरटे जेरबंद

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; काही तासांत गुन्ह्याचा उलगडा
Arrest
Crime News pudhari photo
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर येथील आझाद चौकातील सराफी दुकानातून सोन्याच्या चेन लांबवणाऱ्या परराज्यातील दोन सराईत चोरट्यांना ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून अवघ्या काही तासांत जेरबंद केले. बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

विनायक प्रकाश पाटील (वय १८, रा. दत्तवाडा, जि. नॉर्थ गोवा, राज्य गोवा) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या चोरट्यांकडून दोन सोन्याच्या चेन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरुण सर्जेराव साळुंखे (रा. विटा) यांचे येथील आझाद चौकात सराफी दुकान आहे. बुधवार, दि. २४ जूनरोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या दुकानात दोघे आले. त्यांनी सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने विविध डिझाईनच्या चेन पाहण्यास घेतल्या. नजर चुकवून त्या दोघांनी दोन सोन्याच्या चेन घेतल्या आणि दुचाकीवरून पोबारा केला. या चोरीनंतर अरुण साळुंखे यांनी तातडीने ईश्वरपूर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान संशयित दुचाकीवरून सांगलीच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार अरुण कानडे, अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे आणि रणजीत टोमके यांच्या पथकाने तातडीने सापळा लावला. येथील प्रकाश हॉस्पिटलजवळ विनायक आणि त्याचा साथीदार संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चोरीचे दागिने मिळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news