

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील ३७७ आरक्षित जमिनीपैकी २८३ एकर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी ५० टक्के टीडीआर व ५० टक्के रोखीने मोबदला देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव जागा मालक शेतकऱ्यांनी धुडकावला आहे. बाजारभावानुसार रोखीने मोबदला अदा करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर १२०० एकर क्षेत्रावर साधुग्राम विस्तारीकरणासही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत वाटाघाटीद्वारे भूसंपादन प्रक्रियेबाबत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीसाठी ३७७ एकर क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी ९४ एकर जागा महापालिकेने गत सिंहस्थात संपादीत केली होती. उर्वरित २८३ एकर क्षेत्राच्या संपादनाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. जागा मालक शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात येत आहे. गेल्या महिन्यात साधुग्रामच्या प्रस्तावित क्षेत्रातील १३ जागा मालक धार्मिक ट्रस्ट, संघटनांशी चर्चा केल्यानंतर बुधवारी (दि. १०) आयुक्त मनिषा खत्री यांनी या क्षेत्रातील ३१ शेतकऱ्यांची सुनावणी घेतली. या बैठकीत ५० टक्के टीडीआर व ५० टक्के रोखीने ७१९० रुपये प्रति चौरस मीटर दराने जागा संपादीत करण्याचा प्रस्ताव महापालिकेतर्फे शेतकऱ्यांपुढे मांडला. त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, नगररचना सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव, मिळकत विभागाचे कार्यकारी अभियंता जयवंत राऊत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट तसेच शेतकरी समाधान जेजुरकर, रमेश कोठुळे, शिवाजी गायकवाड, शिवाजी गवळी, दिगंबर चौधरी, योगेश जेजूरकर, अमोल जेजूरकर, नीलेश जेजूरकर, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.
असा आहे महापालिकेचा प्रस्ताव
साधुग्रामसाठी २८३ एकर आरक्षित जागेच्या संपादनासाठी महापालिकेने शेतकऱ्यांसमोर ५० टक्के टीडीआर व ५० टक्के रोखीने मोबदल्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाचे शेतकऱ्यांसमोर सादरीकरण करताना आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने ५० टक्के टीडीआरद्वारे भूसंपादन करण्याची गळ महापालिकेतर्फे शेतकऱ्यांना घालण्यात आली. मात्र, टीडीआरद्वारे भूसंपादनास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून बाजारभावानुसार रोखीने मोबदला अदा करण्याची मागणी केली आहे.
अशी आहे शेतकऱ्यांची मागणी
साधुग्रामसाठी भूसंपादन करताना टीडीआरद्वारे मोबदला मान्य नाही. तपोवनात साधुग्रामचे आरक्षण टाकलेल्या जागा खासगी मालकीच्या आणि वडिलोपार्जित आहेत. त्या जमिनेचे मन मानेल तसे कमी दर ठरवून महापालिकेने शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. बाजारभावानुसार मोबदला अदा करावा. कमी क्षेत्र असलेले शेतकरी भूमिहीन होऊ नये यासाठी त्यांचे क्षेत्र संपादीत केले जाऊ नये. मोबदला देताना दुजाभाव करू नये. २६ हजार रुपये प्रति चौरस मीटर दराने जागा संपादीत करावी.
तर प्रदर्शनी केंद्र आम्ही उभारू
तपोवनात शेतकऱ्यांकडून साधुग्रामच्या नावावर जमिनी संपादीत करत त्यावर प्रदर्शनी केंद्र (माईस हब) उभारले जाऊ नये. महापालिकेला प्रदर्शनी केंद्राची उभारणी करायचीच असेल तर आम्ही जागा मालक शेतकरी ते उभारून देऊ. प्रदर्शनी केंद्राच्या नावावर ही जागा ठेकेदाराच्या घशात घातली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका मांडत प्रदर्शनी केंद्रासाठी साधुग्रामच्या जागेत पक्के बांधकाम होऊ दिले जाणार नाही, असा इशाराच जागा मालक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.
शेतकऱ्यांचा या मुद्यावर आक्षेप
नोटीस देताना भूसंपादनाचा उल्लेख नाही
शेतकऱ्यांना पाठवलेली नोटीस कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करणारी
सक्षम समितीची मान्यता नसताना भूसंपादनाची प्रक्रिया
५० टक्के टीडीआर व ५० टक्के रोखीने मोबदल्याचा निर्णय घेताना सुनावणी नाही
मोबदला देण्यात येईल हा नोटिसीतील उल्लेख अधिकारांचे उल्लंघन करणारा.
साधुग्रामसाठी आरक्षित जमिनीचे संपादन करताना जागा मालक शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. गैरसमज करून घेऊ नये. मोबदल्यासंदर्भात शेतकऱ्यांनी एकाच दरावर अडून न राहता वाटाघाटीतून मार्ग काढावा. पुन्हा बैठक घेण्यात येईल. नांदूर परिसरातील भूसंपादनासाठीच्या जागांचे सर्वेक्षण केले जात आहे. सिंहस्थ प्राधिकरणाशी चर्चा करत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
मनिषा खत्री, आयुक्त, नाशिक मनपा